नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ OTT’वर रिलीज; Zee5′ वर पहिल्याच दिवशी तुफान ट्रॅफिक
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बी स्टारर ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी रिलीज झाला. दरम्यान या चित्रपटातील हटके डायलॉग, कलाकारांचा साधा आणि सत्यवादी अभिनय, गाण्यांमधील झिंग असा झुंड प्रेक्षकांसह समीक्षकांनाही चांगलाच भावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चित्रपटाने बक्कळ कमाई केली. यानंतर आता अजूनही ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांची चिंता करण्याचे कारण नाही. कारण आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे त्यामुळे तुम्हीही हा चित्रपट पाहू शकता ते हि घरात बसून. शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तुफान ट्रॅफिक पाहायला मिळाले.
प्रेक्षकांमध्ये झुंड हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार..? अशी प्रतीक्षा होती. यानंतर आता अखेर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘झुंड’ हा चित्रपट OTT फ्लॅटफॉर्मवर ६ मे २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘झुंड’ने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे.
दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांवर कॉपीराइटचा आरोप होता. त्यामूळे तेलंगणा उच्च न्यायालयाने ‘झुंड’ या चित्रपटाला OTT वर प्रदर्शित करण्यास बंदी घातली होती. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात चित्रपटाच्या निर्मात्यांनी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आणि चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शित करण्याचे आदेश जारी केले. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला.
‘झुंड’ हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित चित्रपट आहे. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारत आहेत. नागराज मंजुळे यांना या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी २ वर्षांचा वेळ लागला. हि कथा लिहिताना त्यांनी अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षकाचं पात्र लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.