हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रवादीचे खासदार आणि मराठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम या भूमिकेवर सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. दरम्यान कुणी त्यांचं समर्थन करतय तर कुणी विरोध. एकंदरच यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन काहींनी अमोल कोल्हे यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका केल्या आहेत.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे एक कलाकार म्हणून समर्थन केले आहे. शिवाय कोल्हेंना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगितले कि, अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. यामुळे त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. गेल्या तीस वर्षांपूर्वी मीही गोडसेंची भूमिका केली होती. याचा अर्थ मी त्यांच्या कृतीचे समर्थन करतो असे होत नाही. भूमिका करणं म्हणजे समर्थन नव्हे. समर्थन करत असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण भूमिका करणं हे माझं उपजीविकेचे साधन आहे तर यात माझी चूक आहे का? म्हणूनच प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही. असे म्हणत नानांनी अगदी माफक शब्दात कोल्हेंच्या टीकाकारांना सुनावलं आहे.
दरम्यान, यापूर्वी खुद्द राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अमोल कोल्हे यांची पाठराखण केली होती. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यापूर्वी नथुराम गोडसे यांची भूमिका केली होती. भूमिका केली म्हणजे गोडसेला समर्थन दिलं अस होत नाही असे पवारांनी म्हटले होते. याशिवाय नथुराम गोडसेंची भूमिका साकारलेले मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील कोल्हेंना समर्थन दिले आहे. ते म्हणाले कि, नथुराम साकारल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विरोध केला नाही छगन भुजबळ तर माझ्या पाठिशी होते. अमोल कोल्हेंची खासदारकी आज आहे, उद्या असेल की नाही माहीत नाही. पण कलावंत म्हणून ते शेवटपर्यंत राहतील, असं म्हणत कोल्हेंच्या नथुरामला पोंक्षे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Discussion about this post