Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे दुःखद निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८७व्या वर्षी आज सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वामन भोसले यांचे पुतणे दिनेश भोसले यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, वामन भोसले यांचे गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का लागला आहे. वामन भोसले यांचे अंत्यसंस्कार आणि अंतिम दर्शन आज गोरेगाव पूर्व, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत.

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्यांना घरातून बाहेर पडता येणे शक्य नव्हते. याचा परिणाम त्यांच्या रोजच्या दिनचर्येवर पूर्णपणे झाला होता. गोवा येथील पोमबुर या गावात जन्मलेले वामन भोसले कामानिमित्त १९५२ साली मुंबईत आले. त्यांनी मुंबईत आल्यावर पाकिजा चित्रपटाचे एडिटर डि.एन.पै यांच्याकडे बॉम्बे टॉकिजमध्ये चित्रपटाविषयी अभ्यासाचे धडे घेतले.

वामन भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत ‘मेरा गांव मेरा देश’, ‘दो रास्ते’, ‘इनकार’, ‘दोस्ताना’, ‘अग्निपथ’, ‘परिचय’, ‘कालीचरण’, ‘कर्ज’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘गुलाम’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांसहित २३० हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले होते. ‘इनकार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘कैरी’ हा त्यांनी एडिट केलेला शेवटचा चित्रपट ठरला.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक तसेच निर्माते मधुर भांडारकर, विवेक वासवानी यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियाद्वारे वामन भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भांडारकर यांनी ट्विटमध्ये लिहिले, मास्टर फिल्म संपादक वामन भोसले जी यांच्या निधनाबद्दल खेद वाटतो. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी भाग्याचे होते. आंधी, कर्झ मिस्टर इंडिया, राम लखन, अग्निपथ, सौदागर, गुलाम आणि बर्‍याच चित्रपटांमधील कलाकुसरींसाठी ते कायमच लक्षात राहतील.