Take a fresh look at your lifestyle.

इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ..; ‘इर्सल’च्या डायलॉग्सला नेटकऱ्यांची पसंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राजकारणात गुलालाशिवाय मज्जाच नाय.. अशी हटके टॅगलाईन असणारा मराठी आगामी चित्रपट ‘इर्सल’ सध्या सोशल मीडियावर भारी चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे इर्सलचा ट्रेलर. अलीकडेच हा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि अगदी तेव्हापासून यातील हटके डायलॉगबाजीचं नेटकऱ्यांमध्ये क्रेझ पहायला मिळतंय. निवडणूक, राजकारण आणि सामान्यांचं आयुष्य या सर्व बाबी एकमेकांवर कश्या अवलंबून आहेत हे या चित्रपटातून दाखवलं आहे. शिवाय जिंकण्यासाठी चुरस कमी आणि शर्यत अधिक असणाऱ्या निवडणुकांच भयाण वास्तव या चित्रपटात दाखवले आहे.

‘इर्सल’ चित्रपटाच्या या दमदार ट्रेलरमध्ये राजकारणामधील सर्वात खालच्या फळीतील घडामोडी दिसतात. ज्यामध्ये अगदी लहान वयातील मुलांपासून ते राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येकाचा समावेश आहे. दरम्यान निवडणूक काळात नेमकं काय काय घडतं..? आणि कसं कसं कोण कोण घडवून आणत..? हे या चित्रपटात पहायला मिळणार असल्याचे दिसते. या ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयाची झलक लोकांना भावली आहे. तर ट्रेलरमधील डायलॉग्सने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

या डायलॉग्सपैकी, इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय, ‘इथला भाय कोणचं नाय, नाद केला ना तर बाद करीन किंवा एकदा पाखरू उडालं ना की त्याचा नाद सोडून द्यायचा तिकीट, पक्ष असल्या कुबड्या बांडगुळांनाचं लागतात या डायलॉग्सने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे कि या चित्रपटात आणखी काय असेल..? अनिकेत बोंद्रे – विश्वास सुतार दिग्दर्शित ‘इर्सल’चे निर्मात विनायक आनंदराव माने व प्रस्तुतकर्ता सूरज डेंगळे आहेत. कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आणि संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. हा चित्रपट येत्या ३ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

भलरी प्रॉडक्शन निर्मित आणि राज फिल्म प्रस्तुत इर्सल चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम यांसह इतरही अनेक कलाकारांच्या अन्य प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांचा समावेश आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही नवीकोरी जोडी मनोरंजन क्षेत्रात आपले नशीब आजमावत पदार्पण करत आहे.