Take a fresh look at your lifestyle.

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’मुळे कपिल शर्मावर ट्रोलिंगचा पाऊस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा ट्रोलिंगच्या जाळयात चांगलाच अडकल्याचे दिसून येत आहे. कधी या कारणामुळे तर कधी त्या कारणामुळे. कधीकाळी कॉमेडी किंग कपिल शर्मा फक्त आणि फक्त त्याच्या विनोदी शैलीमुळे ओळखला जायचा. पण आता ट्रोलिंगसाठी कपिल जास्त चर्चेत असतो. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आमंत्रित न केल्याची तक्रार सोशल मीडियावर केली जात आहे. ‘झुंड’मध्ये ग्लॅमर नाही म्हणून कपिलने त्या टीमला बोलावलं नाही, असे म्हणत नेटकरी कपिलला ट्रोल करताना दिसत आहेत.

कपिल शर्मा आपल्या शोमध्ये फक्त ग्लॅमर असलेले चित्रपट प्रमोट करतो असे नेटकरी म्हणताना दिसत आहे. त्यामुळे आता यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर चित्रपट निर्माती सविता राज हीरेमथ यांनी त्यांची बाजू मांडली आहे. “आमच्या चित्रपटाचं प्रमोशनच उशिरा सुरू झालं होतं” असं म्हणत त्यांनी कपिलचा बचाव केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सविता म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाचं प्रमोशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालं. त्यावेळी कपिल शर्मा हा आठवडाभरासाठी सुट्टीवर गेला होता. जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा आम्ही शोमध्ये जाण्याबाबत निर्णय घेऊ शकलो नाही. कपिल फक्त मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाच आमंत्रित करतो, असं काही नाही.”

अगदी काही दिवसांपूर्वी ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडिया ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमूळेदेखील कपिल चांगलाच ट्रोल झाला होता. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये मोठमोठे स्टार्स नसल्याने कपिल शर्माने आम्हाला त्यांच्या शोमध्ये बोलावलं नाही, अशा आशयाचं हे ट्विट होतं. या ट्विटवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान #BycottKapilSharmaShowचा ट्रेंड सुरू झाला. या हॅशटॅगचा वापर करत अनेक नेटकऱ्यांनी कॉमेडियन कपिल शर्माविरोधात संताप व्यक्त केला होता. इतकेच नव्हे तर या शोवर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती.