हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरुणाईचा अगदी जीव कि प्राणच. उठता, बसता, खाता, झोपता सगळीकडे मोबाईल हा असलाच पाहिजे. अनेको सोडले तर त्यातला एखादाच विना मोबाईल, विना इंटरनेट आणि विना सोशल मीडिया जगणारा सापडेल. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यांची संख्या मोजताना घाम फुटेल इतकी आहे. त्यात वारंवार सोशल मीडियावर काहीतरी नवनवीन ट्रेंड येत असतात आणि ते अगदी काहीच वेळात चांगलेच हिट होतात. लॉकडाउन सुरू झाल्यापासून तर ट्रेंड, चॅलेंजेस आणि हॅशटॅग यांची भली मोठी लिस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळाली. त्यात सध्या सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हाट्सऍप, इंस्टाग्राम सगळ्या स्टेटस ला फक्त आणि फक्त “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. या गाण्याचा नाद लागलाय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मुख्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून लोकांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर कधी, कुठे आणि काय व्हायरल होईल हे सांगता येणे अशक्य आहे. त्यात सध्या “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याचा बहारदार आणि पायांना थिरकवणारा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यात अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. हे गाणे फोटो मिक्स व्हिडिओ एडिटिंग करून अनेकजण सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर विविध पद्धतीने शेअर करताना दिसत आहेत. यात अत्याधिक समावेश हा केंद्र सरकारच्या कामगिरीचे झेंडे दर्शविणारा आहे. आजकालची वाढती महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू पाहत असताना अच्छे दिन आयेंगे म्हणणारे सरकार झोपा काढताना दिसत आहे. यावर अनेक तरुणांनी आपला संताप व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून काढला आहे.
या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर युवकांनी सध्याच्या वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर महागाईचे रेट तसेच नेतेमंडळींचे फोटो एडिटिंग करून करून वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी नेतेमंडळींनी हालचाल करावी असे सुचवले आहे. एकंदर काय तर सोशल मीडियावर या गाण्याच्या माध्यमातून आजचे तरुण सद्यःपरिस्थितीवर भाष्य करत आहेत. याबाबत या गाण्याचे गायक उमेश गवळी म्हणाले की, सध्या इंस्टाग्रामवर अनेक शॉर्ट व्हिडिओ बनवले जातात. तसेच ग्रामीण भागातील व्यक्ती सहज बोलताना देखील “ओ शेठ’ असं बोलून जातो. त्यातून हे गाणे सुचले. यासाठी प्रणीत व संध्या या माझ्या सहकाऱ्यांनी म्युझिक दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या गाण्याबद्दल रसिक मायबापांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, याचे आम्हाला नि:स्वार्थपणे लोकांपर्यंत पोचवत असलेल्या म्युझिकचे समाधान वाटत आहे.