हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०’व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त काही निर्माते तसेच दिग्दर्शकांनी त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा केली आहे. तर काहींनी चित्रपटाच्या घोषणेसह पोस्टर देखील रिलीज केले आहे. यामध्ये आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट ‘बाल शिवाजी’चादेखील समावेश आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये शिवरायांच्या तरुण रुपात प्रेक्षकांचा लाडका परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर दिसतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करत आहेत.
अभिनेता आकाश ठोसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुण रुपात अत्यंत देखणा दिसतो आहे. या चित्रपटात हि मध्यवर्ती भूमिका साकारून आकाश ठोसर त्याच्या अभिनय कारकिर्दीतील अत्यंत वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. आकाशने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या आगामी चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना आकाशने अत्यंत लक्षवेधी असे कॅप्शन दिले आहे आणि त्याचा लूक पाहून सोशल मीडियावर त्याचे चाहते तसेच अन्य कलाकार मंडळी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अभिनेता आकाश ठोसरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना लिहिले आहे कि, ‘लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पाया भरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर’. या पोस्टरमध्ये आकाश शिवरायांच्या लूकमध्ये दिसतो आहे. त्याच्या हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर आणि गळ्यात कवड्यांची माळ दिसते. इतकेच काय तर त्याच्या नजरेतील अंगार बरंच काही बोलून जात आहे. आकाशला या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले असून हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Discussion about this post