हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमाडपंथी… दगड एकमेकांत गुंफून केलेल्या बांधकामाची एक स्तुत्य शैली. आपण सर्वांनीच या शैलीचा इतिहासात अभ्यास केलेला आहे. हेमाडपंथीशीच साधर्म्य साधणारा शब्द म्हणजे ‘गेमाडपंथी’. ‘गेमाडपंथी’… नाव ऐकूनच थोडं आश्चर्य वाटलं ना? ही कोणती नवीन शैली? तर दगड एकमेकांच्या डोक्यात घालून केलेल्या गेमची एक शैली. ही शैली नेमकी काय आहे, तर याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे, प्लॅनेट मराठी ओटीटीवर. नुकतेच ‘गेमाडपंथी’ या वेबसीरिजचे जबरदस्त बोल्ड टिझर सोशल मीडियावर झळकले आहे.
अ प्लॅनेट मराठी ओरिजनल, दि फिल्म क्लिक स्टुडिओज प्रस्तुत, संतोष कोल्हे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग अशी तगडी स्टारकास्ट आहे. टिझरमध्ये सुरुवातीलाच पूजा कातुर्डे मादक अंदाजात दिसत असून प्रणव रावराणेला ती तिच्या प्रेमाच्या जाळयात ओढत आहे. तर दुसरीकडे कोणाला तरी किडनॅप करण्याचा प्लॅन शिजत असल्याचे कळतेय. आता हे किडनॅपिंग कोणाचे आणि कशासाठी आहे, हे ‘गेमाडपंथी’ प्रदर्शित झाल्यावरच कळेल. दरम्यान टिझरवरून ही वेबसीरिज बोल्ड कॉमेडी दिसतेय.
‘गेमाडपंथी’ बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘प्लॅनेट मराठीने आतापर्यंत वेगवेगळे विषय हाताळले आहेत. हासुद्धा कॅामेडीचा वेगळा जॅानर आहे. ही वेबसीरिज शहरी प्रेक्षकांसोबतच ग्रामीण प्रेक्षकांनाही आवडेल अशी आहे. या वेबसीरिजमध्ये कलाकारांची दमदार फळी असून सगळे विनोदवीर एकाच ठिकाणी जमले आहेत. त्यामुळे इथे प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार. ‘गेमाडपंथी’मध्ये बोल्ड सस्पेन्स असल्याने शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारी ही सीरिज आहे. असे हलकेफुलके विषय प्रेक्षकांना आवडता. लवकरच ‘गेमाडपंथी’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे’.
Discussion about this post