हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ट्रोलिंग झालं, टीका झाली पण तरीही या चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा वाढीस लागली आहे. टीझरमधील VFX ची अतिशयोक्ती पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून आदिपुरुषच्या टीमचे कौतुक केले जात आहे. ३ मिनिट १९ सेकंदाच्या या ट्रेलरने रिलीजनंतर फक्त ३ तासांत ३.६ मिलियन व्ह्युज मिळवले आहेत.
आज आदिपुरुषच्या ट्रेलरचा ग्रँड लाँच झाला. या सोहळ्यासाठी प्रभास, क्रिती सॅनॉन आणि चित्रपटातील अन्य कलाकार, तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. आदिपुरुषच्या ट्रेलरने काही तासांतच सोशल मीडिया व्यापला आहे. आदिपुरुषच्या टिझरमधील ज्या चुकांमुळे वाद निर्माण झाला होता त्या चुका यावेळी टीमने टाळल्याचे लक्षात येत आहे. श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, सीतामाईंच्या भूमिकेत क्रिती, पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असे दमदार कलाकार त्यांच्या भूमिकेत उठून दिसत आहेत. या सिनेमात रामायणातील अनेक महत्वपूर्ण घटना आपल्याला नव्या ढंगात पहायला मिळणार आहेत.
या ट्रेलरमध्ये श्रीराम आणि सीतामातेच्या आयुष्यातील संघर्ष, सीतामातेचे हरण, शबरीने दिलेली उष्टी बोरं, हनुमानाने उचललेला पर्वत, हनुमंत रामाची अंगठी घेऊन बंदिवासात असलेल्या सीतेला भेटायला जाणे ते युद्धाप्रसंगी श्रीराम यांनी रावणाच्या दिशेने सोडलेला बाण अशा प्रत्येक बारीक घटनेचे यात चित्रण केले आहे. ट्रेलरमध्ये रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान एकदम शेवटी दिसत असला तरीही भाव खातो आहे. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा येत्या १६ जून २०२३ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. हि रामायणाची गाथा 3D मध्ये मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकदेखील आतुर झाले आहेत.
Discussion about this post