हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. यानंतर आता त्यांचा आगामी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिसवर कल्ला करायला सज्ज आहे. नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये त्या ६ बहिणींची गोष्ट दाखवली आहे ज्यांची जिद्द आजच्या बायकांना जगण्याकडे पाहण्याचे नवा दृष्टिकोन देणारी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता तो थिएटरमध्ये कधी एकदा दाखल होतो असं प्रेक्षकांना झालं आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण गोष्ट या टायटलमध्ये दडली आहे. बाईपण खरोखर फार भारी असतं. एका हाती संसार, एका हाती स्वप्न घेऊन रोज नव्या उमेदीने आयुष्याचा गाडा ओढणारी स्त्री कुणाची आई, ताई, मुलगी, बायको, सून, मैत्रीण असते. प्रत्येक नात्याची एक वेगळी जबाबदारी ती एकटीच पेलत असते. तरीही तिच्या अस्तित्वाबाबत शंका उठवणारे लोक तिच्या आसपास असतात. त्यामुळे हा चित्रपट आणि या चित्रपटातील त्या ६ बहिणींची गोष्ट आजच्या प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने पाहण्यासारखी आहे. ‘बाईपण भारी देवा’चे कथानक महिलांभोवती फिरणारे आहे. मात्र तिच्याशी जोडलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट एक धडा देणारा आहे. येत्या ३० जून २०२३ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला वंदना गुप्ते मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चौकशी करताना दिसतात. या स्पर्धेसाठी त्यांना एक टीम हवी आहे. ज्यासाठी त्यांना अनेक स्त्रियांकडून नकार मिळतो आणि मग त्यांच्या ५ बहिणींना या मंगळागौरीच्या खेळात सहभागी होण्यासाठी विचारतात. मंगळागौरीच्या या स्पर्धेमुळे या ६ बहिणी पुन्हा एकत्र येतात. प्रत्येकीला त्यांचं आयुष्य, संसार, मुलं, जबाबदाऱ्या आहेत आणि यातून त्या मंगळागौर कशा करणार असा प्रश्न असतो. प्रत्येकीच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असताना ‘आपलं अर्ध आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही असं व्हायला नको’ हा विचार करून त्या मंगळागौर खेळायचं ठरवतात. या ६ जणी म्हणून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या जबरदस्त अभिनेत्री आपल्या भेटीला येत आहेत.
Discussion about this post