हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डिस्ने प्लस हॉटस्टारवरील अत्यंत गाजलेली वेब सिरीज सिटी ऑफ ड्रीम्सचे २ सीजन आतापर्यंत आले. हा एक पॉलिटिकल ड्रामा असूनही प्रेक्षकांनी या सीरिजचे कथानक डोक्यावर उचलून घेतले आणि कलाकरांना प्रचंड प्रेम दिले. या दोन सिजनला मिळालेले भव्य यश पाहता आता येऊ घातलेला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा सीजन ३ सुद्धा तुफान गाजणार यात काही शंकाच नाही. याआधी प्रदर्शित झालेल्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आणि आता गुरुवारी या सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामुळे सिरीजबाबत असणारी उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ही वेबसीरिज महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारलेली आहे. ज्यामध्ये गायकवाड कुटुंब हे केंद्रस्थानी आहे. या ट्रेलरमध्ये राज्याच्या सत्तेसाठीचा आणि खुर्चीसाठी सुरु असलेला संघर्ष, गायकवाड कुटुंबातील कलह आणि विरोधकांची एक झलक आपल्याला पहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये राजकीय गुंतागुंतीमध्ये प्रसार माध्यमांची भूमिका देखील महत्वपूर्ण असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ इतर तीन खांब पाडून टाकेल’, असा खणखणीत डायलॉग आपले लक्ष वेधून घेत आहे.
या ट्रेलरमध्ये काही दृश्य पाहिल्यानंतर हा सिझन अत्यंत धगधगता असणार आहे असे दिसत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीजन येत्या २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली असून हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे. सत्तेसाठी भुकेलेले शक्तिशाली गायकवाड आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत. यंदाचा हा सीजन या सिरीजचा शेवटचा सीजन असण्याची शक्यता आहे कारण यामध्ये आता सत्तेसाठीचा अंतिम लढा पहायला मिळणार आहे, असे बोलले जात आहे. या वेबसीरीजमध्ये प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post