Take a fresh look at your lifestyle.

कर्नाटक हिजाब प्रकरणावर अखेर कंगना बोललीच; म्हणाली, हिंमत असेल तर..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कर्नाटक राज्यात हिजाब आणि बुरखा शाळेत परिधान करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चिघळल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालय आणि विद्यालयातील तरुण विद्यार्थी वर्ग या प्रकरणावरून हिंसक आणि आक्रमक झाल्याचे दिसतेय. एकीकडे काही केल्या हा वाद मिटायचे नाव घेत नाही तर दुसरीकडे संपूर्ण जगभरातून विविध स्तरांवरून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान कलाविश्वातून अनेक सेलिब्रिटींनी आपले मत मांडले आहे. यात आता बॉलिवूडची पंगा गर्ल मैदानात उतरली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने दोन वेगवेगळे फोटो शेअर करीत हि इन्स्टा पोस्ट केली आहे. या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड इंडस्ट्रीची पंगा गर्ल म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत हिने आता हिजाब वादात उडी घेतली आहे. कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. कंगनाने इंस्टावर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने २ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. या पोस्टमध्ये इराणमधले हे दोन्ही फोटो तिने शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो हा १९७३ सालातील आहे. यावर कंगनाने लिहिले कि, १९७३ सालामध्ये इराणी महिला बिकिनी घालायच्या. पण आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत.

यानंतर पुढे कंगना म्हणाली की, “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा.” कंगनाच्या या स्टोरीमुळे हिजाब प्रकरणाला आणखीच वेगळे वळण येताना दिसत आहे. कारण कंगनाने पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांसह अनेक नेटकऱ्यांनी तिच्या मताला आदरपूर्वक संमती दर्शवली आहे. तर काही लोकांनी नेहमीप्रमाणे तिला आणि तिच्या पोस्टला विरोध केला आहे.

मात्र तरीसुद्धा कंगनाची ही इंस्टाग्रामवरील स्टोरी चांगलीच चर्चेत असल्याचे दिसत आहे. याआधी अनेकदा कंगना तिच्या रोकठोक वक्तव्यांसाठी वादात अडकल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही न घाबरता तिने नेहमीच विविध मुद्द्यांवर आपले मत प्रकट केले आहे. यानंतर आताही हिजाब प्रकरणावर देशभर संमिश्र मतं व्यक्त होत असताना “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा”, असं कंगना म्हणाली आहे.