Take a fresh look at your lifestyle.

चित्रपटसृष्टीतील उमदा तारा निखळला; रमेश देव यांच्या निधनावर राजकीय स्तरातून शोक व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी निधन झाले. हि बातमी पसरताच सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ते ९३ वर्षाचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे रमेश देव यांचे निधन झाले असून या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल मिळालेली माहिती रमेश देव यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. यानंतर चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थाने पोरकेपण जाणवू लागले आहे. इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी रमेश देव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय राजकीय नेते मंडळींनी देखील शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून रमेश देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला उमदा तारा निखळला. कृष्ण-धवल काळापासून हिंदी चित्रपटांमध्येही अमीट ठसा उमवटणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक. त्यांची सदाबहार व चैतन्यदायी प्रतिमा नव्वदीतही टिकून होती. स्व. रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शोक व्यक्त करणारा संदेश लिहिला आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, प्रख्यात अभिनेते,निर्माते आणि दिग्दर्शक रमेश देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. सुमारे २८५ चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय रंगभूमीवरही त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात जिंदादिल मुशाफिरी करणारे एक जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

याशिवाय सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, जेष्ठ अभिनेते #रमेश_देव यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपट क्षेत्राने एक अत्यंत देखणा,शैलीदार अभिनेता गमावला आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.! भरभरून जीवन जगणारे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून रमेश देव यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले कि, सदाबहार अभिनयाचे विद्यापीठ, मराठी चित्रपटांचा खरा सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते #रमेश_देव यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक प्रकाशमान तारा निखळला आहे. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती प्रदान करो, हीच प्रार्थना… भावपूर्ण श्रद्धांजली!