हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या उफ़ाळत्या वादाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच ‘शिवप्रताप गरुडझेप’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरने सगळ्यांचं लक्ष ओढून घेतलं आहे. हिंदूद्वेष्टा, धर्मांध राजा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाने आपल्या अमानुष कृतीने रयतेचा जीव मुठीत पकडला होता. या टीझरमध्ये औरंगजेब उत्तरेकडील हिंदू मंदिरे पाडत प्रजेवर अन्याय करताना दिसतो. ‘तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा’ असं म्हणतो. यानंतर शिवरायांची एंट्री होते आणि ते म्हणतात.. ‘यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगतो..!’ हा टिझर पाहून चित्रपटाच्या रिलीजबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढल्याचे दिसत आहे.
हा टिझर नीट पहिला तर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण औरंगजेबाचा कपटीपणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची धैर्यशील वीर वृत्ती यातील लढत अत्यंत थरारक आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात आग्र्याच्या भेटीचा इतिहास जिवंत डोळ्यासमोर उभा राहण्यास सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेता डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर क्रुर मुघलशासक औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. या टीझरनंतर हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारी, दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.
‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. या चित्रपटात शिवचरित्रातील आग्रा भेट आणि औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून सुटकेच्या थराराचा अध्याय आपण पाहणार आहोत. डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे आणि संवाद अमोल कोल्हे, युवराज पाटील यांचे असून पटकथा कोल्हे यांची आहे. तसेच हृषिकेश परांजपे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार शशांक पोवार, रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले आहे.
Discussion about this post