हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कित्येक मराठी आणि हिंदी नाटकं आणि चित्रपटांच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर आजही मनाने अतिशय यंग आहेत. आजही ते तितकेच फ्रेश दिसतात आणि यो नाचतात. सध्या ते कोणत्याही चित्रपटात भले दिसत नाहीत मात्र त्यांची ओटीटीवर चांगलीच चर्चा आहे. पण ओटीटीवर काम करताना त्यांनी मनातली खंत व्यक्त केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी कलाकारांना फक्त मराठी भूमिकांसाठीच विचारणा होते, त्यामुळे हव्या तश्या भूमिका मिळत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या एम एक्स प्लेअरवर ‘सिटी ऑफ ड्रिम्स सिझन २’ या वेब सिरीजचा बोलबाला आहे. याच निमित्ताने सचिन पिळगावकर पुन्हा एकदा गुरव नामक एका राजकारण्याची व्यक्तिरेखा यात साकारताना दिसत आहेत. याच दरम्यान पिपींगमून मराठीने सचिन यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्याची इच्छा असतानाही हव्या तश्या भूमिका मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ओटीटीवरच्या हिंदी वेबसीरिजमध्ये मराठी कलाकारांना फक्त मराठी भूमिकाच का ऑफर केल्या जातात? हा मलाही पडलेला प्रश्न आहे, असे ते म्हणाले. शिवाय गेल्या काही वर्षांत मला अनेक ऑफर आल्या पण मी त्यांना नकार दिला. मला एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
‘ हिंदी वेबसीरिजमध्ये एखादी मराठी भूूमिका असेल तरच निर्माता – दिग्दर्शकांना मराठी कलाकारांची आठवण येते. असं का ? असा प्रश्न मला अनेकदा पडतो. हे फक्त मी माझ्या बाबतीत बोलत नाहीये. पण वेगळ्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराचा विचार का केला जात नाही, हे इथलं वास्तव आहे. मराठीत मात्र असा विचार केला जात नाही. कारण कलाकार हा कलाकार असतो. त्यामुळे फक्त मराठी भूमिकांसाठीच मराठी कलाकार हवेत असा विचार ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मात्यांनी करू नये. ‘मी स्वत: एक मराठी कलाकार आहे. पण मी मराठीपेक्षा जास्त काम हिंदीमध्ये केलं आहे. मराठी चित्रपटामध्ये मी मुस्लिम भूमिका साकारत असेन तर मग हिंदीत का नाही? मी मराठी चित्रपटांपासून सुरुवात केली. कारण मराठी माझी मातृभाषा आहे. मला तिचा अभिमान आहे. पण भारतातील इतर ठिकाणी लोक मला फक्त सचिन म्हणून ओळखतात. त्यामुळे मी फक्त एक मराठी कलाकार आहे, असं लोक म्हणत असतील तर ते चूक आहे,’ असे म्हणत सचिन पिळगांवकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Discussion about this post