Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनावर हळहळले मंत्रीमंडळ; पंतप्रधानांनीही व्यक्त केला शोक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार उर्फ मोहमद युसूफ खान यांचे आज पहाटे निधन झाले आहे. दरम्यान ते ९८ वर्षांचे होते. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना गेल्या महिन्यात मुंबई खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केल्यामुळे दिलीप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. शक्य तितके सर्व शर्थीचे प्रयत्न करूनही दिलीप कुमार यांचा प्रवास अखेर आज थांबला आणि बॉलिवूडमधील एक पर्व संपले.

त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहेच. पण मंत्रिमंडळावरही या बातमीचा प्रभाव पडला आहे. अनेको मंत्री महोदयांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शिवाय अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त करीत ट्विट केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले कि, भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले कि, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, दिलीपकुमार जी सिनेसृष्टीतील आख्यायिका म्हणून लक्षात राहतील. त्यांना अतुलनीय तेजोमय आशीर्वाद होता, ज्यामुळे प्रेक्षकांच्या पिढ्यानपिढ्या मंत्रमुग्ध झाल्या. त्यांचे निधन आमच्या सांस्कृतिक जगाचे मोठे नुकसान आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि असंख्य प्रशंसकांना सहानुभूती.आरआयपी.

 

शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना ट्विट करीत लिहिले कि, श्री दिलीपकुमार जी रुपेरी पडद्याची शान होते. भारतीय सिने सृष्टीने एक महान अभिनेता गमावला. त्यांनी आपल्या अविश्वसनीय अभिनय आणि प्रतीकात्मक भूमिकांद्वारे चित्रपट प्रेमींच्या पिढ्यांचे मनोरंजन केले आहे. दिलीप जी यांच्या कुटुंबीय व अनुयायांना सहानुभूती.

दिलीप कुमार यांना १९९४ सालामध्ये दादासाहेब फाळके या उच्च व मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९८ सालामध्ये दिलीप कुमार यांना पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान ए इप्तियाझ’ या पुरस्काराने गौरवले होते. याशिवाय त्यांना २०१५ सालामध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.

यासह २००० ते २००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यदेखील होते. आज दिलीप कुमार आपल्यात भले नसतील मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेले चित्रपटसृष्टीतील काम नेहमीच त्यांना आपल्यात जिवंत ठेवेल. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर सध्या शोककळा पसरली आहे. अनेको कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.