Take a fresh look at your lifestyle.

‘ती आणि शाळा’; अल्लड वयातील प्रेमाचे भाष्य करणाऱ्या नव्या वेबसीरिजचे पोस्टर लॉन्च

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाळेतल्या दिवसांमध्ये खूप गोष्टी अशा असतात ज्या सगळ्यांना सांगता येत नाहीत आणि कित्येकदा विसरता येत नाहीत. कारण शाळेतल्या ‘त्या’ वयात प्रत्येकालाच कोणी ना कोणी ‘ती’ किंवा ‘तो’ हा आवडत असतो. आता अजाण वयातल्या या भावना चूक आहेत असे म्हणणे काही योग्य नाही. कारण भावना या कधीही कुठेही आणि कुणासाठीही उत्पन्न होऊ शकतात. त्यात या भावना विसरणे शक्य नसते कारण त्या प्रत्येकासाठी कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत ‘ती’ आणि शाळा या नव्या वेब सिरीजची घोषणा स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनने नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. या वेबसिरिजच्या शीर्षकावरूनच ही वेब सिरीज शाळेतल्या ‘ती’च्या भोवती फिरणारी आहे हे स्पष्ट होत आहे.

 

दरम्यान शाळेतल्या आठवणींना उजाळा देताना त्या अजाण वयात भेटलेल्या ‘ती’ भोवतीची ही कहाणी आहे. पुढे शाळा संपल्यानंतरही त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठे ‘ती’ हि कायम आहेच. शाळा संपल्यानंतर ‘ती’ त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणते..? यावर भाष्य करणारी ही प्रेमळ वेब सिरीज लवकरच युट्युबच्या माध्यमातून स्टुडिओ ०९’च्या अधिकृत चॅनलवर प्रदर्शित होणार आहे.

हि वेबसिरीज स्टुडिओ ०९ प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित प्रदर्शित करण्यात येणार असून ‘ती आणि शाळा’ या वेब सिरीजमध्ये सातारा आणि वाई येथील स्थानिक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या वेब सीरिजच्या पोस्टरचे नुकतेच साताऱ्याचे खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण झाले आहे.

 

या वेबसिरीजमध्ये अनुश्री माने, आदिनाथ जाधव, श्रावणी सोळसकर, शुभम कुलकर्णी हे मुख्य कलाकार असून सह कलाकार म्हणून सिद्धी जांभळे, सईद मगदूम, रिषभ भैताडे, संदीप वाघमारे, आशुतोष सिंघ, पायल जाधव, माधव सोळसकर, समीक्षा वसनिक, प्रतीक सोनवणे, वनराज कुमकर, मंदार कोल्हटकर हे असणार आहेत. या वेब सिरिजचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा आशिष श्रावणी यांनी केले आहे. तर निर्मिती निर्माते धनेश पाटील यांनी केली आहे. तसेच संवाद आकाश देसाई यांचे असून छायाचित्रण ऋषिकेश देशमुख यांचे आहे. याशिवाय संकलन निखिल गांधी, पार्श्वसंगीत मयूर राऊत, स्थिरचित्र नीलेश बाबर, तर रंगभूषा विनय जाधव यांनी केले आहे.