Take a fresh look at your lifestyle.

अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते…?; मुक्ताच्या ‘Y’ चित्रपटाचं पोस्टर चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सोशल मीडियावर सध्या Y या चित्रपटाची चर्चा जोरदार रंगली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी Y लिहिलेल्या पोस्टरसह फोटो शेअर केल्यानंतर हे Y प्रकरण काय आहे याकडे सगळ्यांचा लक्ष लागला होता. अखेर हा एक अनोख्या कथानकाचा चित्रपट असल्याचे समोर आले आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली. सर्व सामान्यांच्या कल्पनेबाहेर असणाऱ्या ‘ती’च्या लढ्याची गोष्ट घेऊन ‘वाय’ येतोय. हा चित्रपट येत्या २४ जून २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय आणि एका थरारक वास्तवाशी तुमची भेट करून देण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. सध्या या चित्रपटाच्या आक्रमक पोस्टरची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर आहे.

या पोस्टरमध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे एका वेगळ्या आणि अतिशय आक्रमक अंदाजात दिसतेय. तिच्या हातात मशाल आहे आणि हि मशाल घेऊन ती कुणाशीतरी लढतोय असेच काहीसे भासत आहे. पण पोस्टरमध्ये तिचा हा लढा नेमका कोणासोबत, कोणासाठी आणि का आहे..? या प्रश्नांची उत्तरे देत नाही. या प्रश्नांची उत्तरे आता लवकरच प्रेक्षकांना मिळतील. पण तरीही यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे हि मुख्य भूमिकेत दिसणार आहे हे जरी उघड असले तरीही तिच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अन्य कोणते कलाकार असणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

आपल्या नव्या आणि अनोख्या कथानकाच्या ‘वाय’ या कलाकृतीबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, ’या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू केलेल्या उपक्रमाला मान्यवर कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच सर्वसामान्यांनीही पाठिंबा दिला आहे.

अगदी राजकीय नेतेही त्यात मागे नाहीत. खुर्चीला खिळवून ठेवतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘ हायपरलिंक ‘ हा मराठी चित्रपटाचा नवीन आकृतिबंध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’’