चंदेरी दुनिया । ‘कच्चा लिंबू’ आणि ‘हिरकणी’ या सिनेमांचं दिग्दर्शन करणारा प्रसाद ओक आता नाट्यदिग्दर्शनातही पाऊल टाकतोय. ‘तू म्हणशील तसं’ असं तो दिग्दर्शित करत असलेल्या नव्या नाटकाचं नाव असून, अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं या नाटकाचं लेखन केल आहे. प्रशांत दामले यांच्या ‘गौरी थिएटर्स’नं याची निर्मिती केलीय.
प्रसाद ओक आणि प्रशांत दामले यांनी आजवर कधीही एकत्र काम केलेलं नाही. रंगभूमीवर हाऊसफुल्लचा हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या दामले यांच्यासोबत काम करण्याची प्रसादला खूप इच्छा होती. आता निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसाद-प्रशांत एकत्र येत आहेत. पुण्यात असताना यापूर्वी प्रसादनं ‘ब्रह्मचाऱ्याचा विश्वमित्र’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. पुढे दिग्दर्शक होण्यासाठीच तो मुंबईत आला होता. परंतु अभिनेता म्हणून त्यानं नाव कमावलं. मुळात दिग्दर्शनात अधिक रुची असलेला प्रसाद सांगतो की, ‘मुंबईला मी आलो होतो ते दिग्दर्शक होण्यासाठ. पण, अभिनयात एकामागोमाग एक काम मिळतं गेली आणि मी त्यात रमलो. आता मला माझ्यातल्या दिग्दर्शकाला वेळ द्यायचा आहे.
व्यावसायिक नाटक दिग्दर्शित करण्यासाठी गेली काही वर्ष मी संधी शोधत होतो. या नाटकाच्या निमित्तानं माझी ही इच्छा पूर्ण होतेय. संकर्षणसारख्या लेखकाचं लेखन आणि प्रशांत दामले यांच्यासारखा तगडा निर्माता पाठीशी आहे.’ नाटकाच्या जोरदार तालमी सध्या सुरू असून, डिसेंबरच्या मध्यावर हे नाटक रंगभूमीवर दाखल होतंय. नाटकाचा विषय आणि कलाकारांची नावं मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
Discussion about this post