Take a fresh look at your lifestyle.

‘शेती विकायची नसते, राखायची असते’; महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना प्रवीण तरडेंचा मोलाचा सल्ला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे हे शेतकरी पुत्र आहेत. शिवाय ते स्वतः कित्येकदा आपल्या शेतात शेती करताना दिसले आहेत. याचे कारण म्हणजे वावर आहे तर पावर आहे. यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपलं आपल्या मातीशी असलेलं नातं. म्हणूनच तरडे स्वतः शेती करण्यात उत्साही दिसून येतात. आजकाल राज्यातील अनेक शेतकरी पिकांचं नुकसान, कमी दर, कर्ज आणि अनेक अश्या संकटाना घाबरून एकतर शेतजमीन विकतात नाहीतर आत्महत्या करतात. म्हणूनच प्रवीण तरडे यांनी आपल्या वडिलांचे उदाहरण देत महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना अत्यंत मोलाचा सल्ला देत म्हटले कि, शेती विकायची नसते, राखायची असते.

मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते आपल्या शेतात दिसत आहेत. प्रवीण तरडे अनेकदा आपल्या शेतात काम करताना दिसतात. यावेळी व्हिडिओत प्रविण तरडेंचे वडिलदेखील शेतात काम करत असल्याचे दर्शविताना दिसले. यावेळी प्रवीण तरडे यांनी हा व्हिडीओ शूट केला आणि तो आपल्या अधिकृत फेसबुकवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे यांनी आत्ताच्या शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. ते म्हणाले कि, त्यांच्या वडिलांनी ५ किलो वाटाणा पेरला होता. पण या वाटाण्यावर रोग पडल्यामुळे हाती केवळ १/२ किलो वाटाणा उरला. पण तरिही न खचता वडिल शेती करत आहेत असे तरडेंनी सांगितले. दरम्यान आपल्या वडिलांप्रमाणेच तुम्हीही शेती करा, असा सल्ला तरडेंनी आजच्या शेतकरी वर्गाला दिला आहे.

अभिनेता प्रविण तरडे हे स्वतः शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचा लेक म्हणून त्यांनी इतर शेतकरी मित्र वर्गाला ‘मुळशी पॅटर्न’च्या राकट स्टाईलमध्ये अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. यात प्रवीण तरडे म्हणाले कि, ”राज्यातील शेतकऱ्यांनी कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की कितीही संकटं आली तरी खचायचं नाही. शेती करत राहायची कारण शेती विकायची नसते. शेती राखायची असते. हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग आहे ज्याचा वापर करून आजच्या शेतकऱ्यांना न खचता शेती करण्याचा सल्ला प्रवीण तरडे यांनी दिला. इतकंच नाही तर सोबतच राखलेली शेती अशीच कसायची असते, असेही ते म्हणाले.