Take a fresh look at your lifestyle.

पंजाबी अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा काळाच्या पडद्याआड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पंजाबी फिल्म इंडस्ट्रीला आज आणखी एका मोठा धक्का लागला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांच्या निधनानंतर पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे आज निधन झाले. आज पहाटे २ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान ते युगांडा येथे होते, अशी माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तास त्याचे असिस्टंट जगदेव सिंह यांनी दुजोरा दिला आहे.

अभिनेता सुखजिंदर शेरा हे गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी आपल्या एका मित्राला भेटायला केनियाला गेले होते. दरम्यान केनियात असताना २५ एप्रिल रोजी त्यांना ताप असल्याचे जाणवले. त्यानंतर डॉक्टरांकडून त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे निदान झाले. प्रकृती बिघडल्यावर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य ते सर्व उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरु होते. मात्र त्यांची तब्येत आणखीच खालावल्याने बुधवारी (आज) पहाटे २ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

 

सुखजिंदर शेरा हे पंजाबी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता होते. त्यांनी अनेक सूप्रसिद्ध पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. यारी जट्ट दी, जट्ट ते जमीन या सिनेमात ते दिसले होते. सध्या ते यार बेली या सिनेमाचे चित्रीकरण करीत होते. सुखजिंदर शेरा हे लुधियानामधील जगराव येथील मलकपूरचे मूळ रहिवासी होते. यामुळे सुखजिंदर यांचे पार्थिव पंजाबमध्ये आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे प्रयत्न सुरू आहेत.

अगदी गेल्याच महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले होते. पंजाबी सिनेमांसोबत बॉलिवूडच्या ३००हुन अधिक चित्रपटांमध्ये सतीश कौल झळकले होते. त्यांनी आपल्या अभिनयाने पंजाबी आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीमध्ये नावलौकीक मिळविले होते. सतीश कौल दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि यातच त्यांचे निधन झाले होते. सतीश यांनी महाभारतात इंद्रदेवाची भूमिका साकारली होती.