राज-लेखाच्या विवाह सोहळ्याचे फोटो वायरल; पत्रलेखाच्या ओढणीवरील बंगाली संदेश चर्चेत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. हि आनंदाची गोष्ट दोघांनीही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितली आहे. विशेष म्हणजे आपल्या विवाहाचे फोटो शेअर करताना दोघांनीही कॅप्शनमध्ये आपल्या भावना आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. राजकुमार आणि पत्रलेखाचा विवाह हा प्रेमविवाह असून त्यांच्या विवाह सोहळ्याचे अतिशय सुंदर असे फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. दोघांचेही चाहते यावर भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत. मात्र या फोटोंपैकी एका फोटोची चर्चा जरा जास्तच रंगली आहे आणि याचे कारण आहे पत्रलेखाच्या ओढणीवरील बंगाली संदेश.
अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखन या दोघांनी इंस्टाग्रामवर आपल्या विवाहाची माहिती देत फोटो शेअर केले आहेत. पत्रलेखाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं आहे की, आज माझं लग्न झालं आहे. माझा प्रियकर, माझा क्राइम पार्टनर, माझं कुटुंब, माझा जीवनसाथी… गेल्या ११ वर्षांपासून माझा सगळ्यात चांगला मित्र! तुमची पत्नी होण्यापेक्षा मोठी भावना नाही! तर दुसरीकडे, राजकुमार रावने इंस्टाग्रामवर लिहिलं की, “अखेर ११ वर्षांचं प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मस्तीनंतर, माझा सोलमेट, माझा चांगला मित्र, माझं कुटुंब, माझे सगळं काहीसोबत आज लग्न झालं. पत्रलेखा आज मला तुझा नवरा म्हणण्यापेक्षा मोठा आनंद नाही. कायमचं… आणि नंतरही…”
या दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये विवाह सोहळ्यात पत्रलेखाने परिधान केलेल्या ओढणीवर एक सुंदर असा बंगाली संदेश लिहिलेला दिसत आहे. यामुळे तिच्या ओढणीची आणि ओढणीवरील बंगाली संदेशाची फारच चर्चा रंगली आहे. या वाक्याचा नेमका अर्थ काय असेल याबाबत प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. पण अर्थातच तिने स्वतःच्या विवाह सोहळ्यादिवशी एखादा मजकूर असलेली ओढणी परिधान केली आहे म्हणजे नक्कीच याचा अर्थ त्यांच्या नात्याशी आणि नात्यातील प्रेमाशी संबंधित असणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.