Take a fresh look at your lifestyle.

लता दीदींची प्रकृती चिंताजनक; राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनियाची एकत्र लागण झाल्यामूळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मध्यंतरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. असे वृत्त बाहेर आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा दीदींची प्रकृती ढासळली आहे. गेल्या महिन्याभरापासून लता दीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले आहे.

लता दीदी हे व्यक्तिमत्व अत्यंत मायास्वरूप असल्यामुळे लता दीदींचे अनेक लोकांशी जिवाभावाचे नाते आहे. त्यांपैकी एक म्हणजे ठाकरे कुटुंब. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लता दीदींशी एक वेगळेच मात्र अत्यंत जिव्हाळ्याचे नातेसंबंध आहेत. यामुळे लता दीदींची प्रकृती खालावल्याने समजताच राज ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी स्वतः लता दीदींच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. शिवाय लता दीदींवर उपचार करीत असलेल्या डॉ. प्रतीत समदानी यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी लता दीदींच्या प्रकृतीचा संपूर्ण आढावा घेतला आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. दरम्यान टोपे यांनी सांगितले होते कि, लता दीदी आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. यानंतर लता दीदींच्या प्रमुख प्रवक्त्यांनीदेखील लता दीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. यानंतर आज अचानक लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.