Take a fresh look at your lifestyle.

१०८ वर्षांचा अभूतपूर्व इतिहास; आजच प्रदर्शित झाला होता पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ब्लॅक अँड व्हाईट चलचित्रपटापासून ते आजचा VFX पर्यंतचा भारतीय सिनेसृष्टीचा प्रवास आजच्या दिवशीच सुरु झाला. देशाला सिनेसृष्टीच्या जगतात घेऊन येणारा पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ आज तब्बल १०८ वर्षे पूर्ण करीत आहे. या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. या चित्रपटाची निर्मिती करणे काही सोप्पे नव्हते. मात्र या चित्रपटाचे निर्माते तसेच भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांनी अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य करून दाखविली.

दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० साली झाला. त्यांनी कधीच चित्रपट पाहिला नव्हता. साधारण ४१ वर्षाचे असताना मित्राच्या हट्टापायी ते गिरगावच्या अमेरिका इंडिया थिएटरमध्ये प्रदर्शित इंग्रजी चित्रपट ‘अमेजिंग अॅनिमल’ पाहायला गेले. पडद्यावर पहिल्यांदाच त्यांनी लोकांना चालताना पाहिले. हे पाहून ते पुरते अवाक झाले. त्यांनी हि गोष्ट सर्वाना सांगितली असता त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. मग दुस-याच दिवशी ते कुटूंबाला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा सर्वांची खात्री पटली. यानंतर दादासाहेब फाळके नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी जाऊ लागले. जेव्हा त्यांनी ‘द लाइफ ऑफ क्राइस्ट’ मध्ये येशू ख्रिस्त पडद्यावर चालताना पाहिले, तेव्हा आपले देव श्रीराम आणि कृष्णही असे चालता-फिरताना दिसले तर असा विचार त्यांच्या मनात आला. इथून झाली सुरुवात स्वप्न सत्यात साकारण्याची.

यानंतर दादासाहेब चित्रपट निर्मितीसाठी थेट लंडनला जाऊन पोहोचले. चित्रपट बनविण्याच्या हट्टाला पेटलेले दादासाहेब लंडनमध्ये जाऊन फिल्म मेकिंग शिकले. दोन आठवड्यानंतर ते मुंबईत परतले. १ एप्रिल १९१२ मध्ये ‘फाळके फिल्म्स’ नावाची प्रोडक्शन कंपनी त्यांनी सुरु केली. चित्रपट बनविण्याचे स्वप्न पाहणे जितके सोपे होते त्याहून जास्त त्यासाठी निर्माता शोधणे कठीण होते. तेव्हा दादासाहेबांवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. म्हणून दादासाहेबांनी मटारचे झाडं विकसित करण्यावर एक छोटा चित्रपट बनविला. त्यानंतर यशवंत नाडकर्णी एवं नारायण राव यांना विश्वास निर्माण झाला आणि ते दादासाहेबांना पैसे देण्यास तयार झाले.

 

पुढे चित्रपटासाठी कलाकार शोधण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली. मात्र त्यांना कुणाचाही अभिनय विशेष पसंत आला नाही. त्यानंतर त्यांनी नाटकातील काही कलाकार निवडले. ज्यात पांडुरंग गढाधर सने, गजानन वासुदेव आणि दतात्रेय दामोदर दबके यांचा समावेश होता. चित्रपटासाठी लागणारी सर्व सामग्री आणि कलाकार निवडल्यानंतर दादरच्या मुख्य रोडवर असलेल्या स्टुडिओमध्ये २१ दिवस या चित्रपटाचे शूटिंग चालले. त्यानंतर २१ दिवसांनी हा मूक चित्रपट तयार झाला. २१ एप्रिल १९१३ मध्ये ग्रांट रोडला या चित्रपटाचे प्रीमिअर झाले. ३ मे १९१३ साली गिरगावच्या बॉम्बे कॉर्ननेशन थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिला भारतीय चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. हे पाहून दादासाहेब फाळके यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्यातील जिद्द, चिकाटीने आणि स्वप्नाने रचला एक अभूतपूर्व इतिहास….’राजा हरिश्चंद्र’