Take a fresh look at your lifestyle.

‘शेर शिवराज’च्या कलाकारांचे राजमाता कल्पनाराजे भोसलेंकडून कौतुक; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीसमोर यावा, यासाठी रुपेरी पडद्यावर इतिहासाची सुवर्ण पाने उलघडण्याची कामगिरी निर्माते बजावत आहेत. दरम्यान अफजलखानाचा वध कसा आणि का केला हा इतिहास आपल्याला लवकरच ‘ शेर शिवराज’ या चित्रपटाच्या माध्यामातून पहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. याचदरम्यान शिवरायांचे वारस छ. उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री अर्थात राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेण्याचे भाग्य चित्रपटाच्या टीमला लाभले. ‘जलमंदिर पॅलेस’ सातारा येथे कलाकारांनी राजमाता यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजमातांनी संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले आहे.

‘शेर शिवराज’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची टीम सातारा येथे प्रमोशनसाठी आली होती. दरम्यान हा सुवर्ण भेटीचा योग जुळून आला. ‘पावनखिंड’ चित्रपट पाहिल्यानंतर छ. उदयनराजे यांनी राजमाता यांना हा चित्रपट पाहण्यासाठी आग्रह केला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर राजमातांच्या डोळयासमोर समग्र अभिमानाने उभा राहिला असे त्यांनी सांगितले. यामुळे इतिहासाचे आणखी एक पान उलघडणाऱ्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला मनापासून शुभेच्छा देत राजमाता यांनी चित्रपटातील कलाकारांचे भरभरून कौतुक केले. चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काही अनुभवदेखील त्यांनी कलाकारांकडून जाणून घेतले. राजमाता यांची भेट आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटासाठी मिळालेला त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी अमूल्य होता असे चित्रपटातील कलाकारांनी सांगितले.

 

या भेटीदरम्यान ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, कलाकार चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड, निर्माते प्रद्योत पेंढरकर आदि कलाकार मंडळी उपस्थित होती. तसेच पंकज चव्हाण (सातारा सांस्कृतिक बीजेपी प्रकोष्ट प्रदेश उपाध्यक्ष), सुनील काटकर (माजी शिक्षण सभापती), अभिजीत भोसले, सौरभ सुपेकर (वाडयातील समस्त), दिपक प्रभावळकर(संपादक,तरुण भारत), सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदीप गोजमगुंडे, रोहित सावंत आदि मान्यवरदेखील उपस्थित होते.