Take a fresh look at your lifestyle.

रमेश भैय्याच्या जाण्याने माझं वैयक्तिक नुकसान झालं; अशोक मामांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर ६० वर्षाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी २ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आणि चित्रपटसृष्टीतील आणखी एक उमदा तारा निखळला. यानंतर चित्रपट सृष्टी शोकाकुल झाली. दरम्यान अनेक दिग्गज कलाकारांनी रमेश देव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी रमेश देव यांच्या निधनाने माझं वैयक्तिक मोठं नुकसान झालं असून मी माझा मोठा भाऊ गमावला असे साश्रू नयनांसह भरलेलया उरातून हुंदके देत सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाल्याची बातमी समजताच अशोक मामा अत्यंत भावूक झाले. त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. डोळ्यात अश्रूंचा महासागर आणि भरलेल्या उरातून त्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. अशोक मामा म्हणाले, रमेश देव हे माझे मोठे भाऊ होते. त्यांच्या निधनाने माझं वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं आहे. रमेश देव यांच्या ९३’व्या वाढदिवशी जेव्हा मी फोन केला तेव्हा त्यांच्यासोबत मी खूप बातचित केली. अगदीच तीन दिवसांपूर्वी वाढदिवस आणि त्यानंतर हि अशी बातमी ऐकायला मिळणं मला अपेक्षित नव्हतं. त्यांचे निधन हि मराठी चित्रपटसृष्टीची खूप मोठी हानी आहे.

पुढे, माझ्या आयुष्यातील पहिल्या चित्रपटाची सुरुवात ही त्यांच्यासोबतच झाली होती. माझ्या आयुष्यातील पहिला ऑन कॅमेरा शॉट हा त्यांच्याबरोबर होता. त्यावेळी ते मराठीतले फार मोठे हिरो होते. त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर सिनेमा म्हणजे काय असतं ते मला कळलं होतं. मी त्यांच्यासोबत बरेच चित्रपट केले. त्यांचं आणि माझं खूप वेगळं नातं होतं. ते मला धाकला भाऊ मानायचे. मी त्यांना रमेश भैय्या असंच म्हणायचो. त्यांचं वागणंही खूप चांगलं होतं. ते समजावून सांगायचे. माझ्याबाबत त्यांना अतिशय चांगल्या सद्भावना होत्या. मला ते सतत सल्ले द्यायचे. मी माझा मोठा भाऊ गमावला”.

 

पुढे, “परवा त्यांचा वाढदिवस होता. मी नेहमी त्यांना फोन करतो. त्यादिवशीही त्यांना फोन केला होता. त्यांनी फोन घेतला. पण त्यावेळी त्यांचा आवाज फार थकलेला होता. ते हळूहळू बोलत होते. मी म्हटलं, भैय्या काय झालं तुझी तब्येत बरी नाही का? ते म्हणाले, बरी आहे. आमचं चांगलं बोलणं झालं. मी शुभेच्छा दिल्या. पण मला वाटलं नव्हतं की मला दोन दिवसांनी असं ऐकायला मिळेल. अत्यंत वाईट बातमी आहे. ही माझी सर्वात मोठी वैयक्तिक हानी झाली आहे. मी माझा मोठा भाऊ गमावला”, अशा शोक संवेदना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.