असंच काहीसं घडलं होतं.. कदाचित?; प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन उद्याच येतोय.. ‘रानबाजार’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडिया रानबाजार या आगमी वेब सिरीजच्या चर्चेने रंगलाय. याचे मुख्य आकर्षण म्हणजे बोल्ड बिंदास्त अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सुंदर सोज्वळ अभिनेत्री प्राजक्ता माळी. या दोघींच्या बोल्ड टीझरने तर आधीच सोशल मीडियावर वातावरण गरम केलं होत. यानंतर आता त्यांच्या रानबाजार या वेब सिरीजचा तडकता फडकता ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने तर भल्याभल्यांची शिट्टी गुल्ल केली आहे. अनेकांनी तेजस्विनी आणि प्राजक्ताच्या बोल्ड सीन्सवर टीका केल्या होत्या. मात्र चाहत्यांचा खंबीर पाठिंबा आणि अभिनयाच्या जोरावर आता रानबाजार चा ट्रेलर सोशल मीडिया गाजवतोय.
प्लॅनेट ओटीटी मराठी निर्मित आणि अभिजित पानसे दिग्दर्शित रानबाजार हि वेब सिरीज एक अत्यंत आक्रमक तशीच लक्षवेधी सिरीज आहे. नुकताच रिलीज झालेला ट्रेलर अवघ्या २ मिनिट ११ सेकंदांचा आहे. पण थरार काय असतो..? हे जर जाणून घ्यायचं आहे तर हा ट्रेलर पहायलाच हवा. इथे सगळेच धंदा करतात म्हणत राजकारणातील मालिन वृत्तीवर भाष्य आणि जळजळीत टीका करणारी हि वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. हि वेब सिरीज एक पॉलिटिकल क्राईम थ्रिलर ड्रामा आहे. त्यामुळे मनोरंजन होणार का..? तर १००% होणार. येत्या २० मे २०२२ रोजी म्हणजे उद्याच रानबाजार प्रदर्शित होणार आहे.
मुख्य म्हणजे या ट्रेलरच्या माध्यमातून सीरिजमधील नायकांची ओळख झाली आहे. यामध्ये अनेक नामवंत चेहरे दिसत आहेत. ज्यात प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, मोहन आगाशे, सचिन खेडेकर, मोहन जोशी, अनंत जोग, मकरंद अनासपुरे, माधुरी पवार, उर्मिला कानेटकर, अभिजित पानसे, अतुल काळे, रोहित कोकाटे, वैभव मांगले, जयवंत वाडकर, अनिल नगरकर, सुदेश म्हशीलकर, वनिता खरात, सुरेखा कुडची, नम्रता गायकवाड, निलेश दिवेकर, रमेश चांदणे, उपेन चौहान, भरत दाभोळकर या दिग्गजांचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार, रानबाजार हि वेब सिरीज सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित आहे. सध्या या वेब सीरिजच्या ट्रेलरने संपूर्ण सोशल मीडिया व्यापून टाकला आहे आणि नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आतापर्यंत अनेक अशा भूमिका गाजवल्या आहेत. ज्या थोड्या बोल्ड आणि मसालेदार होत्या. पण प्राजक्ता माळीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अशी बोल्ड भूमिका साकारली नव्हती. त्यामुळे प्राजक्ताचं या भूमिकेत असणं थोडं सरप्रायझिंग होत. मात्र एक नवी आणि आव्हानात्मक भूमिका करताना प्राजक्ताने देखील एक नवा अनुभव घेतला आणि त्याचा आपल्याला आनंद असल्याचे ती म्हणाली.