Take a fresh look at your lifestyle.

रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ कायदेशीर अडचणीत; एका सीनमुळे उफाळला वाद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’चा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपट जोरदार चालणार अशी आशा होती. मात्र या चित्रपटाचे भविष्य सध्या धोक्यात दिसत आहे. कारण प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील एका सीनमुळे वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे हा सीन काढून टाकण्याची मागणी करत याचिकेतून चित्रपटाला कायदेशीर हिसका दाखवण्यात आला आहे. महिला, तिचं गरोदरपण आणि स्त्री- पुरुष समानता या विषयावर आधारित या चित्रपटामध्ये गर्भ लिंगनिदान करताना दाखवण्यात आले आहे. या सिंवरून असा काही वाद उफाळला कि चित्रपटाला कोर्टाची पायरी चढावी लागली आहे.

रणवीरचा जयेशभाई जोरदार या चित्रपटाविरोधात दिल्लीतील हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जयेशची पत्नी ही एका रुग्णालयातून गर्भ लिंगनिदान करुन घेते. त्यात ती डॉक्टर जयेशला सांकेतिक भाषेमध्ये मुलगा की मुलगी हे सांगते. हे दृश्य अनेकांच्या पचनी पडले नाही आणि यामुळे काहींनी याच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान हि याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, या चित्रपटातून गर्भ लिंग निदान विषयीच्या नियमांचे थेट आणि उघडपणे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घ्यावा. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटातून सोनोग्राफीबद्दल जे चूकीचे मेसेज समाजाला दिले आहेत ते त्वरित काढून टाकावेत. अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

एका इंग्रजी वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, पवन प्रकाश पाठक यांनी याचिकेतून ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कायद्याने प्रसुतीपूर्वी गर्भ लिंग निदान चाचणी करणे गुन्हा आहे. त्यामुळे या चित्रपटातून अशा प्रकारची दृश्ये दाखवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे चित्रपटातून ते दृष्य तातडीनं वगळावे. अशी मागणीसुद्धा कऱण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत बोमन इराणी, रत्ना पाठक शाह आणि शालिनी पांडे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेता दिव्यांग ठक्करने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर विशाल- शेखर आणि अमित त्रिवेदी यांनी या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे. येत्या १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.