Take a fresh look at your lifestyle.

‘बलात्कार मुक्त महाराष्ट्र’; बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाईंचा एल्गार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस सीजन ३ या पर्वातून नुकत्याच झालेल्या चावडी दरम्यान स्पर्धक तृप्ती देसाई एव्हीक्ट झाल्या. यावेळी तृप्ती देसाईंसह घरातील प्रत्येक सदस्य भावुक झाल्याचे दिसले. पण सगळ्यांना सावरत तृप्ती यांनी प्रत्येक स्पर्धकाला चांगले खेळण्याचा सल्ला देत कधीही कॉल करा तुम्हाला नक्कीच मदत करेन, असं आश्वासनही दिलं. पुढे, घरातून बाहेर आल्यानंतर मांजरेकरांसोबत स्टेजवर असताना आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना आपण लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. यानंतर आता तृप्ती देसाई ‘बलात्कार मुक्त महाराष्ट्र’ आंदोलनासाठी पुकार लगावणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

अलीकडे गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांवर होणारे घरगुती हिंसाचार, बलात्कार या घटनांमध्ये अतिशय वेग दिसून आला आहे. दिवसागणिक या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा स्थितीत देशात, राज्यात बलात्काराविषयी जनजागृती, समुपदेशन करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहेत. यानंतर आता महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी कायम झटणाऱ्या तृप्ती देसाई यांनी एल्गार पुकारला आहे. ‘बलात्कार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार करीत त्या या आंदोलनाकडे आक्रमकरीत्या वळल्या आहेत. याविषयी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या आंदोलनाची रुपरेषा सांगितली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या कि, “आतापर्यंत आपण स्त्री-पुरुष समानता, मंदिरातील स्त्रियांचा प्रवेश यावर आंदोलन केली होती. परंतु, आता याहून जास्त महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बलात्कार. लहान लहान मुलींवरही बलात्कार केले जात आहेत. आणि, हे कुठेही थांबत नाहीये. त्यामुळे आमचं पुढचं आंदोलन हे बलात्कारमुक्त महाराष्ट्र हे असेल. “बलात्काराविषयीची जनजागृती मला राज्यभरात करायची आहे. जिल्हा,तालुका, गाव या सगळ्या स्तरांवर मला जायचंय. महिलांबाबतची तुमची मानसिकता काय? ही राक्षसी प्रवृत्ती कुठून येते? महिलांनी सुद्धा न घाबरता दुर्गेचं रुप धारण करुन रस्त्यावर उतरलं पाहिजे. याचसाठीच कोणी तरी पुढाकार घेऊन नेतृत्व करणं गरजेचं आहे.”

 

पुढे, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असे जे काही भाग आहेत. त्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. वेळ लागेल. पण जीवाचं रान करायची माझी तयारी आहे. कारण, आपला महाराष्ट्र बलात्कारमुक्त झाला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असतील. ज्यावेळी आम्ही कृतीत उतरु त्यावेळी हा मोठा फरक झालेला दिसेल. ८ मार्च २०२१ मध्ये मी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये लॉकडाउन लागला. त्याचवेळी मी बिग बॉसच्या घरात दिसले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कृतीत उतरण्याची वेळ आली आहे. म्हणूनच, बिग बॉसच्या माध्यमातून मी या आंदोलनाची माहिती दिली.