हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूडमधील गेल्या काही काळात कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे उघडकीस आली. अनेक अभिनेत्रींनी, या कलाविश्वाशी संबंधित असलेल्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. मात्र तरीदेखीलहा ‘कास्टिंग काऊच’चा प्रकार अजूनही सर्रासपणे सुरू असल्याचं निदर्शनात येतंय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईने तिलाही एकदा ‘कास्टिंग काऊच’च्या अनुभवातून जावे लागल्याचं सांगितलं आहे.
‘उतरन’ या मालिकेतील तपस्या या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या रश्मीने अलिकडेच झालेल्या ‘बिग बॉसच्या १३’मध्ये सहभाग घेतला होता. हा शो संपला असला तरी रश्मी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. यात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला. ती म्हणाली,‘मी एकदा ऑडिशनला गेले होते. त्यावेळी माझ्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ घालण्यात आले होते. मात्र हा प्रकार माझ्या आईला समजल्यानंतर तिने संबंधिताला चांगलीच अद्दल घडविली’.
“१३ वर्षांपूर्वी मी जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा वयाने आणि अनुभवाने खूपच लहान होते. तसंच मला कुठलाही कलाक्षेत्राचा वारसाही नव्हता. त्यामुळे मला स्ट्रगल करावा लागत होता. याच दरम्यान, जर तू कास्टिंग काऊचचा सामना केला नाहीस तर तुला कधीच काम मिळणार नाही, असं सूरज नामक एका व्यक्तीने मला सांगितलं होतं. आता तो काय करतो,कुठे असतो याविषयी मला काहीच माहिती नाहीये. परंतु सुरुवातीला त्याने मला याविषयी विचारलं. खरं तर मला तेव्हा याचा अर्थ देखील माहिती नव्हता. इतकंच नाही तर मला या गोष्टींची कल्पनाही नाही हे त्यालादेखील माहित होतं”, असं रश्मी म्हणाली.
ती पुढे म्हणते, “तो पहिला व्यक्ती होता ज्याने मला फसवण्याचा आणि माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने मला एकदा ऑडिशनसाठी बोलावलं. त्याच्यावर विश्वास ठेऊन मी तिकडे गेलेही होते. मात्र तेथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आमच्या दोघां व्यतिरिक्त तिथे कोणीही नाही आहे. फक्त एक कॅमेरा होता. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी सतत त्याला मला हे असलं काही करायचं नाहीये हे सांगत होते.जवळपास दोन तास त्याच्याशी यावर वाद घातल्यानंतर मी तेथून व्यवस्थित बाहेर पडले. त्यानंतर घरी आल्या वर आईला सांगितलं. हा प्रकार ऐकल्यानंतर माझी आई त्याला भेटायला गेली आणि त्याला तिने चपराक लगावली”.