रवी जाधव यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर फोटो शेअर करीत दिली माहिती
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला एक वेगळे स्थान निर्माण करून देण्यात अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांचाही समावेश आहे. आतापर्यंत विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे बनवून रवी जाधव यांनी इंडस्ट्रीत एक मानाची जागा निर्माण केली आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराच्या आयुष्यात एका व्यक्तीची एक्झिट चटका लावणारी ठरली आहे. रवी जाधव यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या आईचा फोटो शेअर करीत त्यांच्या निधनाची वार्ता दिली आहे.
मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आईचे निधन झाल्याने संपूर्ण जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवी जाधव यांच्या आईचे शुक्रवारी २७ मे २०२२ रोजी निधन झाले असल्याची माहिती रवी जाधव यांनी स्वतःच सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे. यात लिहिलंय आई… (१९ जुलै १९४८ – २७ मे २०२२). रवी जाधव यांच्या आईचे नाव शुभांगीनी जाधव असे होते. निधनादरम्यान त्या ७४ वर्षांच्या होत्या.
रवी जाधव हे नाव आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. शिवाय हे नाव सतत चर्चेत असते. यामुळे त्यांचा असा चाहता वर्ग आहे. रवी जाधव यांच्या आईचे निधन झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. रवी जाधव यांच्या दुःखात त्यांचे चाहते, सहकारी, मित्र आणि संपूर्ण मनोरंजन सृष्टी सहभागी झाली आहे. गतवर्षी ९ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या वडिलांचे म्हणजेच हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे निधन झाले होते. यानंतर आता वर्षभरानंतर लगेचच त्यांच्या आई शुभांगीनी हरिश्चंद्र जाधव यांचे निधन झाले आहे.