Take a fresh look at your lifestyle.

रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा ‘आठवा रंग प्रेमाचा’; 17 जून रोजी प्रदर्शित होणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड अंदाजामुळे तर कधी हटके स्टाइलमुळे. ती सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती स्वतःच आपल्या चाहत्यांना देत असते. नुकतेच तिने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘आठवा रंग प्रेमाचा’. हा चित्रपट येत्या १७ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रेमाच्या संकल्पनेवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा‘ हा चित्रपट येत्या १७ जून २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हे कलाकार या चित्रपटातील मुख्य भूमिकेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल रिलीज झाले असून रिंकूने आपल्या इंस्टावर शेअर केले आहे. अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव , राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

अ टॉप अँगल प्रॉडक्शनचे समीर कर्णिक यांनी ‘क्यु हो गया ना..’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि आपली छाप सोडली. यानंतर “यमला पगला दिवाना”, ‘चार दिन की चांदनी’, ‘हिरोज’, ‘नन्हे जैसलमेर’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन समीर यांनी केले आहे. यानंतर आता त्यांचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ प्रेक्षकांना किती आवडतो आणि कसा भुरळ घालतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर रिंकू पुन्हा एकदा मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. सैराटच्या भरघोस यशानंतर मेकअप, कागर, १०० डेज वेबसीरीजच्या माध्यमातून तिने काम केले आहे.