Take a fresh look at your lifestyle.

बाबा .. मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेशची भावुक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ७५वी जयंती आहे. त्यांचे नसणे आजही अनेकांना सहन होत नाही. कितीतरी लोकांना हि गोष्ट अजूनही मान्यच नाही. विलासरावांनी त्यांचा काळ राजकीय क्षेत्रात उत्तम कामगिरीने गाजवला आहे. एक उत्तम लीडर महाराष्ट्राने त्यांच्या मध्ये पाहिला आहे. आज त्यांची ७५वी जयंती असताना त्यांची आठवण येऊन अनेक कार्यकर्ते भावुक झाल्याचे पहायला मिळाले आहे. मग अशावेळी कुटुंबीयांची अवस्था काय असेल याची तर कल्पनाही करवत नाही. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. ‘बाबा तुमची खुप आठवण येत आहे’ असं म्हणत त्याने सर्वांनाच भावुक केलय.

अभिनेता आणि दिवंगत मंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख याने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याची दोन्ही मुलं विलासरावांच्या फोटोपुढे बसून अभिवादन करत आहेत. या पोस्टमध्ये रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रितेशने लिहिलं की , ‘बाबा, मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना बघायचं आहे. मला तो क्षण पहायचा आहे, जेव्हा तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणता की, मी तुझ्या कायम सोबत आहे. मला तुमचा हात पकडून चालायचं आहे. मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ- डे पप्पा, मला तुमची खूप आठवण येत आहे.’ रितेशच्या पोस्टमधून त्याच्या भावनांचा पूर दिसून येतोय. तर या पोस्टने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलंय.

आजपर्यंत आपल्या कारकिर्दीत एक अभिनेता म्हणून रितेशने आपले एक वेगळे आणि उच्च स्थान निर्माण केले आहे. इतकेच नव्हे तर आपल्या कार्य क्षेत्राशिवाय तो एक उत्तम फॅमिली मॅनसुद्धा आहे. त्याने आयुष्यात खूप आत्मसाद केलं असलं तरीही त्याचे पाय जमिनीला टेकून आहेत हीच त्याची विशेषता. पण आयुष्यभर उणीव राहील अशी एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात आहे आणि ती म्हणजे बाबा. त्यांच्या नसण्याचं दुःख त्याच्या मनात कायम आहे आणि ते अनेकदा दिसूनही आलंय.

विलासरावांनी कुटुंबाप्रमाणे अवघ्या महाराष्ट्रावर भरभरून प्रेम केलं आहे. विलासराव देशमुख यांचा जन्म २६ मे १९४५ रोजी महाराष्ट्रातील बाभळगाव येथे झाला होता. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनी २ वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं. यानंतर १४ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रितेशने याआधीही विलासरावांच्या कोटसोबत एक भावनिक व्हिडीओ तयार केला होता जो चांगलाच व्हायरल झाला होता.