Take a fresh look at your lifestyle.

‘रू.60 लाख डिपॉझिट आणि 10 लाख मासिक भाडं…’; क्रितीच्या कृतीवर आस्ताद काळेची पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा रोखठोक अभिनेता आस्ताद काळेची एखादी पोस्ट आली आणि त्यावर चर्चा रंगली नाही किंवा ती व्हायरल झाली तर नवलंच. कारण आस्ताद हळूच टोमणा, खोचक टीका, उपरोधिक शेरा आणि शालजोडी देण्यात एकदम वस्ताद आहे हे सारेच जाणतात. त्यामुळे त्याची प्रत्येक पोस्ट चांगलीच चर्चेत असते. आताही त्याने केलेली पोस्ट अशीच काही चर्चेत आहे. या पोस्टमधले आकडे वाकडे विचार करायला प्रवृत्त करत आहेत. कारण आस्तादच्या पोस्टमध्ये थोडं सरळ आणि थोडं वलयं आहे. म्हणा त्याच्या जवळजवळ सगळ्याच पोस्ट अभ्यास करूनच लिहिलेल्या असतात त्यामुळे तशाही भारी असतात. त्याच्या आताच्या पोस्टमध्ये काही आकडेवारींचा उल्लेख आणि कुठेतरी थेट रोख आहे. त्याने नाव लिहिले नसले तरी नेटकऱ्यांना ओळखायला थोडीच वेळीच लागतोय.

‘रु.६० लाख deposit, आणि रु.१० लाख मासिक भाडं भरून राहाण्यापेक्षा घर विकत घेणं अधिक बरं नाही का??’ असे लिहीत एक पोस्ट आस्तादने फेसबुकवर केली आहे. विशेष म्हणजे, हे आकडे माझ्याशी संबंधित नाहीत, असेही त्याने या पोस्टमध्ये अगदी आवर्जुन नोंदवले आहे. पण आस्तादइतकेच त्याचे चाहतेही चांगलेच हुश्शार आहेत. त्यांनी आस्तादचा निशाणा बरोबर ओळखला. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, ‘हाच प्रश्न मी बातमी वाचल्यापासून विचारतोय, १.८ करोडची उलाढाल. नाही म्हटलं तरी जुहूमध्ये उच्च प्रतीचे घर नक्कीच मिळेल. पण भाड्याची जागा ऐसपैस आहे म्हणून हा खटाटोप असेल. मिमी म्हणे,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. ‘मिमी’ कोण ते कळलं नाही का? अहो बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन. होय. या पोस्टचा संबंध क्रितीशी आहे.

याचे कारण म्हणज, अभिनेत्री क्रिती सॅननने अमिताभ बच्चन यांचा अंधेरी भागातील एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाडे तत्त्वावर घेतला आहे. शिवाय यासाठी तिने दोन वर्षांचा करार केला आहे. या घरासाठी क्रिती दरमहा १० लाख भाडं देणार आहे अशीही माहिती आहे. अगदी सिक्युरिटीपोटी तिने ६० लाख रूपये डिपॉझिट स्वरूपात भरल्याचंही कळतंय. म्हणूनच आस्तादने पोस्टमधून क्रितीच्या कृतीवर भाष्य केले आहे. आस्तादच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. त्यातील ‘देणा-याचं माहित नाही, पण घेणारा मी असतो तर आयुष्यात किती मज्जा आली असती ना…,’ आणि अन्य एकाने लिहिलेय, ‘मी रिअल इस्टेटचे काम करतो. असा ग्राहक असेन तर कळवा,’ अशा स्वरूपाच्या भन्नाट मजेशीर कमेंट केल्या आहेत.