हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्ञान आणि मनोरंजनच अद्भुत खेळ म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. या कार्यक्रमातून प्रेक्षक विविध क्षेत्रातील विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी असामान्य संधी आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी होत असतात. शनिवारच्या विशेष भागात नेहमीच कलाकार येतात आणि विविध सामाजिक संस्थांसाठी खेळतात. येत्या विशेष भागात म्हणजे उद्या अभिनेत्री साई ताम्हणकर उपस्थित राहणार आहे. ती ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल यांच्यासोबत खेळात सहभागी होणार आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या दोघी नागपूरच्या ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. ‘प्रोजेक्ट बाला’ या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात. तर सई आणि सौम्या ज्या संस्थेसाठी खेळणार आहेत ती संस्था वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करते आणि याच संस्थेसाठी सई खेळणार आहे. ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना हि १९९२ साली झाली असून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन आजही करत आहे. या लोकांना समाजात सन्मानाने जगता यावं, स्वावलंबी बनवता यावं म्हणून हि संस्था झटत आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर मूळची सांगलीची असल्यामुळे या विशेष भागात तिने अनुभवलेले किस्से आणि तीच सांगलीवरचं प्रेम ती दिलखुलासपणे व्यक्त करणार आहे. ‘आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात’, असे मत सईने कार्यक्रमात व्यक्त केले. ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग उद्या शनिवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. आत्तापर्यंत कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या विशेष भागांमध्ये अभिनेत्री काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहिले होते.