Take a fresh look at your lifestyle.

आज भाई का Birthday है! सलमान साजरा करतोय 56वा वाढदिवस; जगभरातून पडतोय शुभेच्छांचा पाऊस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २७ डिसेंबर असून आज बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता ज्याला भाईजान म्हणून ओळखतात म्हणजेच अभिनेता सलमान खान याचा ५६वा वाढदिवस आहे. दिनांक २७ डिसेंबर १९६५ रोजी इंदौर येथे सलमानचा खान कुटुंबात जन्म झाला आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला तेजोमय तारा मिळाला. गेली ३३ वर्षे सलमान अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्याने स्वतःच्या अभिनयाने आणि दिलखुलास स्वभावाने हजारो…,लाखो…,करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साल १९८८ मध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटामधून सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि झाला सर्वांचा लाडका भाईजान. आज वाढदिवसानिमित्त जगभरातून सलमानचे चाहते वेगवेगळ्या भाषेत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. चला तर जाणून घेऊयात आपल्या लाडक्या भाईजानविषयी काही खास गोष्टी खालीलप्रमाणे:-

अब्दुल रशीद सलीम म्हणजेच सलमान खान. भारतीय सिने इंडस्ट्रीत आल्यानंतर तो सलमान म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमानने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात करण्यापूर्वी अगदी टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. तो एक उत्तम नट, निर्माता आणि उत्तम माणूस आहे. सलमान याने आपल्या कारकिर्दीत चित्रपट निर्माता म्हणून २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर अभिनयासाठी २ फिल्मफेअर पुरस्कारांसह इतर अनेक मानांकित पुरस्कार मिळवले आहेत.

साल १९८९ मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सलमानने स्वतःची लव्हार बॉय म्हणून छाप सोडली. यानंतर १९९८ मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात त्याने काजोलसोबत काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचा भाऊ सोहेल खान याने केले होते. या चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यात सलमानने आपली बॉडी दाखवली आणि तरुण वर्गाला अतिशय आकर्षित केलं. हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

यानंतर सलमान खानने ‘तेरे नाम’ चित्रपटात राधे मोहनची भूमिका साकारत प्रेमाची एक अनोखी भाषा लोकांना समजावली. राधे हा विलक्षण प्रेमी होता आणि हे सलमानने साकारलेले अतिशय आव्हानात्मक पात्र होते. याशिवाय त्याने ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातही हतबल प्रियकराची उत्तम भूमिका साकारली होती. यात त्याने ऐश्वर्या रायसोबत काम केले होते.

सलमानच्या कारकिर्दीतील सर्वात हटके चित्रपट ठरला तो ‘वॉन्टेड’. या चित्रपटातून सलमानने अॅक्शन हिरो म्हणून बॉक्स ऑफिसवर अगदी कहर केला. यानंतर सलमानने दबंग, किक, एक था टायगर या चित्रपटातून स्वतःची अनोखी छाप पडली. या सगळ्यात सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट चांगलाच भाव खाऊन गेला. मुन्नी नावाच्या पाकिस्तानी मुलीला तिच्या कुटुंबापर्यंत सोडण्यासाठी धडपड करणारा भाईजान सगळ्यांना भावला. असा सलमान नुकताच अंतिम चित्रपटाच्या माध्यमातून पंजाबी पोलिसांच्या भूमिकेत झळकला आणि हा सिनेमा देखील चांगलाच हिट गेला.

सध्या सलमान ‘बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सिजनचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. सलमान त्याच्या रील लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये करोडो लोकांचा चाहता असण्याचे कारण म्हणजे त्याचा खुशमिसाज अंदाज.

आज जगभरातून कित्येक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत. तर त्याचे अनेक चाहते फक्त एक झलक दिसावी या आशेपायी त्याच्या बांद्रा येथील गॅलक्सी निवासस्थानी गर्दी करीत आहेत.

माहितीनुसार सलमान त्याच्या वाढदिवसाचे आणि नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पनवेलच्या फार्महाउसवर गेला आहे. पण आपल्या चाहत्यांसाठी तो बांद्रा येथे येईल अशी शक्यता नाकारता येत नाही. तर पुन्हा एकदा बॉलिवूड दबंग आणि चाहत्यांच्या भाईजानला वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा!