Take a fresh look at your lifestyle.

‘मुलगी झाली हो’ मालिकेचे चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न; संभाजी ब्रिगेडचे सेटवर ठिय्या आंदोलन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ सध्या चांगलीच वादात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेतील अत्यंत लोकप्रिय पात्र विलास पाटील हे साकारणारे अभिनेते किरण माने याना तडकाफडकी मालिकेतून काढण्यात आले. यामुळे संपूर्ण राज्यातून संबंधित प्रकरणावर रोष व्यक्त केला जात आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष, नेते मंडळी आणि मुख्य म्हणजे कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या होत्या. यानंतर आता मालिकेचे साताऱ्यातील वाई तालुक्यातील गुळुंब या गावात शूटिंग सुरु असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकता दाखवत सेटवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामुळे सेटवर घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम मालिकेच्या चित्रीकरणावर पडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरण माने प्रकरण दिवसागणिक चिघळताना दिसत आहे. एकीकडे कलाकाराची अश्या पद्धतीने गळचेपी करण्यामुळे सर्व स्तरांतून राग व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मालिकेच्या निर्मात्यांनी आणि वाहिनीने परिपत्रकातून किरण माने यांच्यावर महिला सह कलाकारांसोबत गैरवर्तन केले असल्याचा आरोप लावला होता. यानंतर मात्र हे संपूर्ण प्रकरण वेगळ्याच दिशेला वाहत गेले. दरम्यान किरण माने यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तर आज जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती दिली आहे.

 

 

किरण माने यांच्यावर मालिकेतील इतर महिला कलाकारांकडून गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. मात्र मानेंनी आधीच आपल्या राजकीय भूमिका घेण्यामुळे मालिकेतून काढून टाकल्याचे माध्यमांना स्पष्ट केले होते. यानंतर महिला कलाकारांमध्ये दोन गट पडल्याचे दिसले. यातील एकीकडून मानेंवर आरो तर दुसरीकडून समर्थनाचे झेंडे फडकवले गेले आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने देखील निर्माते आणि वाहिनीकडे स्पष्टीकरण मागितले होते. यानंतर आता संभाजी ब्रिगेडने देखील आपली आक्रमक भूमिका घेत चित्रीकरणावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे.