Take a fresh look at your lifestyle.

‘संतूर सम्राट’ पद्मभूषण पंडित शिवकुमार शर्मा काळाच्या पडद्याआड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संतूर सम्राट अशी ओळख असणारे प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. हि बातमी समजताच संपूर्ण संगीत कला क्षेत्रात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत निधन झाले. दरम्यान ते ८४ वर्षांचे होते. गेल्या ६ महिन्यांपासून पंडितजी किडनीशी संबंधित आजाराने त्रासलेले होते. दरम्ह्णान ते डायलिसिसवर होते अशी माहिती आहे. मात्र कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. पंडित जी संतूर वादनाच्या सुरातील एक असा सूर आहेत ज्यांचे हरपणे अत्यंत त्रासदायी आहे.

‘पद्मभूषण पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म १९३८ साली जम्मू येथे झाला. त्यांनी आपल्या वडिलांकडून गायन कलेचा अभ्यास केला. मात्र संतूर वाद्यावर त्यांचा हात चांगलाच बसला होता. संतूर या वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार आहेत. भारताला लाभलेल्या शास्त्रीय संगीताच्या वारस्याला नव्या उंचीवर पोहोचवण्यामध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सगळ्यात महत्वाची बाब अशी कि, संतूर हे वाद्य मुळातच जम्मू आणि काश्मीरमधील लोकवाद्य आहे. यामुळे संतूर शिकल्यानंतर या वाद्याची एक नवी ओळख पंडितजींनी बनविली. संतूर या वाद्याला त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे पंडित शिवकुमार यांना ‘संतूर सम्राट’ अशी पदवी प्रदान करण्यात आली.

पंडितजींनी ८० आणि ९० चा काळ चांगलाच गाजवला होता. दरम्यान बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी भारी जमली होती आणि हि जोडी चांगलीच गाजलीदेखील होती. पुढे या जोडीला ‘शिव- हरी’ या नावाने ओळख मिळाली. यांनी एकत्र अनेक चित्रपटांतील गाण्यांना संगीतबद्ध केलं. त्यात यश चोप्रा यांचा १९८० साली प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘डर’ अशा अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले. मात्र आता हा सूर हरवला आहे. पंडितजींचे निधन झाल्याच्या वृत्ताने संगीत आणि कलाविश्वात शोककळा पसरली आहे.