Take a fresh look at your lifestyle.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट अडचणीत; वंशजांकडून तरडेंवर गंभीर आरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी सिनेसृष्टीत अत्यंत आघाडीवर कार्यरत असणारे लेखक, अभिनेता दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आगामी सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तळबीड गावचे सुपुत्र व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील चित्रपट सरसेनापती हंबीरराव येत्या २७ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अवघ्ये ७ दिवस चित्रपट प्रदर्शित होण्यास बाकी असताना हंबीरराव मोहिते यांचे वंशजांनी विरोध सुरू केला आहे. चित्रपटातील अनेक गोष्टीवर आक्षेप घेत वंशजांना विश्वासात न घेता चुकीची माहिती दिल्याचा आरोप वंशजांनी केला आहे. तसेच आम्हांला सांगितल्याप्रमाणे काहीही केले नसून दिग्दर्शक मनमानी पध्दतीने चित्रपटाची कथा प्रदर्शित करत असल्याचा आरोप वंशजांनी केला.

कराड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वशंजांनी शुक्रवारी दि. २० मे २०२२ रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी तळबीड गावचे सरपंच जयवंतराव मोहिते, जयाजीराव मोहिते, नितीन मोहिते, महेंद्र मोहिते, केशव मोहिते, अॅड. अमोल मोहिते, बाळासाहेब मोहिते, प्रविण मोहिते, शुभम मोहिते, अनिल मोहिते आदी उपस्थित होते.

जयवंतराव मोहिते म्हणाले, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा मोठा संघर्षाचा इतिहास आहे. छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांच्यासोबत 13 वर्षे स्वराज्यासाठी काम केले. छ. संभाजी महाराजांना गादीवर बसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड गावाचे कोणत्याही प्रकारचे चित्रपटात चित्रीकरण नाही. आम्ही वंशज म्हणून काही आमचे चित्रपटातील दृश्याबाबत ही आक्षेप आहेत, ते दूर करण्यासाठी पहिल्यांदा आम्हांला चित्रपट दाखविण्यात यावा. त्यानंतरच प्रदर्शित करावा, अन्यथा या चित्रपटास आमचा विरोध असणार आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशावळ तसेच पुतळा व फोटो काही चुकीचे बदल दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी केले आहेत. तसेच मूळचा पुतळ्यात बदल करून प्रविण तरडे यांनी स्वतः च्या वडिलांचा चेहरा वापरण्याचा प्रयत्न केला. तसेच ते पुतळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज ठाकरे आणि नितिन गडकरी यांनी दिला. त्यावेळी तळबीड येथील लोकांनी तळबीड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा आम्हांला सातारा येथे पोलिसांनी बोलावून म्हणणे ऐकून घेतले, तसेच पुतळ्यामध्ये बदल न करण्याच्या सूचना चित्रपट टीमने मान्य केल्या. अशा चुकीच्या पध्दतीने बदल व चुकीचा इतिहास चित्रपटातून लोकांच्यापुढे जावू नये, असे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी सांगितले.