हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारलेली ‘वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स’ ही नवी हिंदी वेब सीरिज येत आहे. नुकतेच या वेब सीरिजचे पोस्टर आणि दोन रोमांचक टीझर प्रदर्शित करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे या सिरीजमध्ये मराठी अभिनेता सौरभ गोखले हा वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसतो आहे. याबाबत त्याने स्वतः त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने वीर सावरकरांची भूमिका साकारताना आलेला अनुभव शेअर केला आहे.
वीर सावरकरांची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाविषयी बोलताना सौरभ म्हणाला कि, ‘कोणत्याही कलाकाराला ऐतिहासिक भूमिका साकारायला मिळणे हे त्याचे भाग्य असते. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करण्याची मला संधी मिळाली आहे. वीर सावरकरांचे साहित्य वाचून, त्यांचा अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ही भूमिका साकारण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तसेच सीरिजचे पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘मी विनायक दामोदर सावरकर! तात्याराव सावरकर… हिंदु हृदयसम्राट सावरकर… स्वातंत्र्यवीर सावरकर… होय आणि माझ्या टीकाकारांच्या मते देशद्रोही सावरकर… देशद्रोही आणि सावरकर?’
पुढे लिहिलंय, ‘मी माझ्याबद्दल फार बोललो नाही…काळ खूप वेगाने पुढे सरकत आहे… इतिहास नाहीसा होतो मग विनायक दामोदरसारख्या सामान्य माणसाची गोष्ट कोण लक्षात ठेवील? पण कथा कोणा एका विशिष्ट व्यक्तीची नाही.. ती व्यक्ती घडवणाऱ्या सामान्य-असामान्य लोकांची आहे! तो ज्या मातीत जन्मला, जिथे तो वाढला, त्याचा इतिहास म्हणजे त्याची कहाणी. माझी गोष्ट सांगायच्या आधी मनात विचारांचे वादळ उठले… माझ्या आयुष्याबद्दल कसं सांगू? मी काय सांगावं ? आणि आणखी…’वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’…लवकरच’. या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार असून याची निर्मिती डॉ. अनिरबन सरकार करणार आहेत. ही सीरिज तीन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. येत्या २६ फेब्रुवारी २०२३ रोजी वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला हि सिरीज रिलीज होणार आहे.
Discussion about this post