Take a fresh look at your lifestyle.

रुग्णालयात..158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी..? सयाजी शिंदेंचा BMC’ला खडा सवाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी, हिंदी, आणि अगदी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेता सयाजी शिंदे हे अत्यंत लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. ते केवळ त्यांच्या अभिनयासाठी नव्हे तर समाजिक कार्यांमुळेही परिचित आहेत. सर्व क्षेत्रात उत्साहाने सहभागी होणारे सयाजी शिंदे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यामुळे ते नेहमीच आपले अनुभव आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बाबींविषयी बोलताना दिसतात. सामाजिक क्षेत्रात वृक्ष संवर्धनाचा वसा घेत सयाजी शिंदे कार्यरत आहेत. त्यामुळॆ निसर्गाचा ऱ्हास होईल अशी कोणतीही गोष्ट निदर्शनास आली तर ते बोलल्याशिवाय राहत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केलाय. जो फार चर्चेत आहे.

अभिनेता सयाजी शिंदे यांनी माणूस म्हणून निसर्गाप्रती आपली भूमिका स्पष्ट करीत नेहमीच वृक्ष संरक्षण आणि वृक्ष संवर्धन केले आहे. सयाजी शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहेत. एक उत्तम कलाकार असण्यासोबत त्यांनी पर्यावरण जपण्याचेही काम केले आहे. दरम्यान अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करत असतात. दरम्यान वृक्षतोडीवर ठाम बोलताना ते कधीही विचार करत नाहीत. त्यामुळे मुंबईतील सायन रुग्णालयात होणाऱ्या वृक्षतोडीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील सायन रुग्णालयात तब्बल १५८ झाडांची तोड करणार आहेत. रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी या ही झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. यातील २ झाडे नुकतीच तोडण्यात आली आहेत अशी माहिती मिळताच सयाजी शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी आपला व्हिडीओ शेअर करीत संबंधित विषयी संताप व्यक्त केला आहे.

अभिनेते सयाजी यांनी याबाबत संताप व्यक्त करताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, “ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत.” असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.