Take a fresh look at your lifestyle.

पद्म पुरस्कारांचा दुसरा टप्पा संपन्न; लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री प्रदान

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या कलेचा वारसा फार मोठा आहे हे आपण सारेच जाणतो. मग कोणतेही क्षेत्र असो.. गायन, नृत्य, चित्र, शिल्प या सर्व कलांमध्ये महाराष्ट्रीय संस्कृती अग्रेसर आहे. या प्रत्येक कलेचा वारसा कायम ठेवणाऱ्या कलाकारांमुळे आजही महाराष्ट्रात सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा तितक्याच आत्मीयतेने सांभाळलेला आहे. म्हणूनच नामांकित पद्म पुरस्कार देऊन अशा प्रत्येक कलाकाराला गौरविले जाते. नुकताच पद्म पुरस्कारांचा दुसरा टप्पा संपन्न झाला. यामध्ये ख्यातनाम लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुलोचना दीदींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. गेल्या ७५ वर्षांपासून सुलोचना दीदींनी हा वारसा कायम राखला आहे.

जेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा गौरव स्वीकारण्यासाठी सुलोचना दीदी समोर आल्या तेव्हा सर्वांच्या नजर खिळून राहिल्या. थरथरणारे हात, थकलेलं शरीर मात्र कामाप्रती आदर आणि डोळ्यातील प्रत्येक भावना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये निर्मिती झालेल्या मराठी चित्रपटांचे लावणी विशेष आकर्षण असत. विशेष करून जे चित्रपट तमाशापट यावर आधारित होते, त्या सर्व चित्रपटांमध्ये लावण्या आजही लोकांना तालावर थिरकवतात. या लावण्या गाणाऱ्या गायिका सुलोचना चव्हाण यांनी ७०- ८० च्या दशकापासून हि कला जोपासली आहे.

 

ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबईत झाला. त्यांचे सध्याचे वय ८९ वर्षे एवढे आहे. दरम्यान पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुलोचना दीदी यांनी अनेक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांमध्येही लावण्या गायल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये सुधीर फडके अर्थात बाबूजी तसेच राम कदम यांचे संगीत असायचे. तर ऎशी- नव्वदीच्या काळातील चित्रपटांमधील अधिकतर गाणी आणि लावण्या या गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या असायच्या. सुलोचना दीदींनी गायलेल्या लावण्यांपैकी पाडाला पिकलाय आंबा, खेळताना रंग बाई होळीचा, तुझ्या उसाला लागंल कोल्हा, नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची या लावण्या आजही सुपरहिट आहेत.