‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ : प्रसाद ओकच्या व्यक्तिरेखेत दिघेसाहेबांचा भास; शिवसैनिक झाले भावुक
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आगामी चित्रपट ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा येत्या १२ मे २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच याचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र या चित्रपटाची चर्चा आहे. यानंतर नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा जल्लोषात पार पडला.
या चित्रपटात आनंदराव दिघे यांच्या आव्हानात्मक भूमिकेत मराठी अभिनेता प्रसाद ओक दिसत आहे. त्याचा लूक हा अतिशय हुबेहूब आनंद दिघे यांच्यासारखा आहे. दरम्यान या सोहळ्यात जेव्हा प्रसादने एंट्री घेतली तेव्हा त्याला पाहून दिघेसाहेब आल्याचा अनेकांना भास झाला. यावेळी दिघेंचे कुटुंबीय आणि शिवसैनिकांचे डोळे पाण्याने भरल्याचे दिसून आले. संपूर्ण वातावरण भावुक झाले होते.
आनंद दिघे हे नाव आजच्या तरुणाईलाही ठाऊक असेलच. याचे कारण म्हणजे या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची केले. यामुळे ठाण्याचा वाघ आणि धमर्वीर अशी आनंद दिघे यांची ख्याती निर्माण झाली. यामुळे आघाडीचे दिग्दर्शक, लेखक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी दिघे साहेबांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचे योजिले. या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
या सोहळ्या दरम्यान प्रसादाची दिघे साहेबांच्या शैलीतील एंट्री कमाल करून गेली. यामुळे सध्या प्रसादच्या मेकअपचं सर्वांना कौतुक वाटत आहे. एवढंच नाही, तर शिवसैनिकांना देखील दिघे साहेब स्वतः आले असल्याचा भास झाला. तसेच यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान प्रसाद ओकला आनंद दिघे यांच्या गेटअप मध्ये पाहून एकनाथ शिंदेदेखील भावुक झाले. इतकेच नव्हे तर आदराने ते पडण्यासाठीही झुकले. याशिवाय आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणा गडकरी याना आपले अश्रू अनावर झाले.
गाण्याचा लाँचिंग सोहळा संपन्न झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओक यांचे फोटोसेशन सुरू असताना एकनाथ शिंदे सर्वांसमोर प्रसाद ओकच्या पाया पडले हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय. सध्या प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.