Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली; उपचारांसाठी आयसीयूत केले दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना अगदी काहीच दिवसांपूर्वी रुग्णालयातून स्थिर अवस्थेत डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. यावेळीदेखील श्वास घेण्याच्या तक्रारीमुळेच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे माहिती मिळत आहे. त्यांना शवसनासंबंधित त्रास जाणवताच तातडीने मुंबईच्या पी डी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आई. सध्या उपचारांसाठी त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची बातमी मिळत आहे. अगदी काहीच दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही वेळ येणे अत्यंत काळजीची बाब असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या वेळी देखील दिलीप कुमार याना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत असल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांची पत्नी सायरा बानो या त्यांच्या अधिकरीउट ट्विटर हॅण्डलवरून त्यांच्या प्रकृतीविषयीच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टी चाहत्यांना सांगत होत्या. यावेळी अद्याप तरी त्यांच्या ट्विटर हँडलवर कोणतीही माहिती प्रसिद्ध झालेली नाही. मात्र खात्रीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप कुमार यांची प्रकृती निश्चितच चिंताजनक आहे.

तूर्तास दिलीप कुमार यांची बिघडती प्रकृती पाहून त्यांना आय सी यु मध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती मिळत आहे. यामुळे सध्यातरी त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे सांगण्यात येत आहे. या आधीही २ वेळा दिलीप कुमार याना रुग्णालयात नेताना पाहून त्यांच्या चाहत्यांना धडकी भरली होती. दिलीपकुमार यांना श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे ६ जून २०२१ रोजी हिंदुजा रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. यानंतर डिस्चार्ज होण्याच्या एक दिवस आधी, दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात जमा झालेले पाणी किरकोळ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले होते. साधारण ५ दिवसांनंतर त्यांना ११ जून २०२१ रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

दरम्यान अनेकांनी तर सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातम्या देखील पसरवल्या होत्या. मात्र या अफवा खोट्या असल्याचे सायरा बानो यांनी स्पष्ट केले होते. नेहमीप्रमाणे दिलीप कुमार यांच्या चाहत्यांमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी पसरली आहे आणि यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतही चिंताजनक वातावरणाचे वारे वाहू लागले आहेत.