मकसूद भाई उर्फ सुरेंद्र राजन यांची अभिनय क्षेत्रातून निवृत्ती; ‘व्हू एम आय’मध्ये केले शेवटचे काम
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता संजय दत्त याच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सुपरहिट चित्रपटात मकसूद भाई हि लहान पण लक्षवेधी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुरेंद्र राजन अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात त्यांनी रुग्णालयात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याची भूमिका निभावली होती आणि मुन्नाभाईने त्यांना ‘जादू की झप्पी’सुद्धा दिली होती. हा सीन प्रेक्षकांना खूप भावला होता आणि आजही हा सिन लोकप्रिय आहे. वयाच्या ८४व्या वर्षी सुरेंद्र राजन यांनी अभिनय विश्वाला आणि अर्थातच बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम करायचे पक्के केले आहे. ‘व्हू ॲम आय’ या चित्रपटानंतर ते निवृत्तीपथ स्वीकारणार आहेत.
सुरेंद्र राजन यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक दमदार लहान पण अत्यंत लक्षवेधी अशा भूमिका साकारल्या आहेत. सुरेंद्र राजन यांचा शेवटचा चित्रपट ‘व्हू एम आय’ (Who Am I) याचा वर्ल्ड प्रीमिअर लंडनमध्ये पार पडणाऱ्या २४व्या UK Asian Film Festivalमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. सुरेंद्र राजन यांनी आतापर्यंत अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’सह ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’, ‘आर. राजकुमार’, ‘फंस गये रे ओबामा’, ‘धमाल’, ‘बच्चन पांडे’ यांसारख्या कमाल चित्रपटांचा समावेश आहे.
या शेवटच्या चित्रपटाआधी सुरेंद्र राजन यांनी काही काळासाठी पण मोठा असा ब्रेक घेतला होते. दरम्यान ते उत्तराखंड येथे रहायला गेले होते. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम करण्याआधी त्यांनी आणखी एका चित्रपटात काम करायचे मनाशी ठरवले होते. म्हणून त्यांनी ‘व्हू ॲम आय’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारली आणि या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते कोविड काळात मध्य प्रदेशपर्यंत प्रवास करून गेले होते. या काळात राजन यांना आर्थिक संकटांनाही मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले होते. सुरेंद्र राजन यांच्याकडे त्यावेळी घराचं भाडं भरायलासुद्धा पैसे नव्हते आणि अशा वेळेत त्यांना अभिनेता सोनू सूदने मदत केली होती. अभिनेता सुरेंद्र राजन यांनी अनेक लहान सहन भूमिकांसह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही भूमिका साकारली आहे.