Take a fresh look at your lifestyle.

सेर सिवराज है! शिवजयंतीच्या निमित्ताने गायक दिव्य कुमार यांचे शिवरायांना सुरेल नमन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्याला पराक्रमी राजांच्या इतिहासाची परंपरा लाभली आहे. आपल्या इतिहासातील राजे आणि त्यांचे मावळे यांच्याविषयी आपण अनेकदा वाचले असेल. जीवाची बाजी लावून आपल्या राजाशी निष्ठा राखणारे मावळे आणि आपल्या मावळ्यांच्या घरात कांदा भाकर खाणाऱ्या राजाची रयत म्हणून बोलावून घेण्याचे भाग्य मिळणे फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा रयतेचा राजा असे म्हटले जाते तेव्हा प्रत्येकाच्या ध्यानी मनी एकच नाव येते आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण ते केवळ राजे नव्हते तर त्यांनी राजा कसा असावा याचा पायंडा रचला आहे. त्यामुळे शिवरायांचे गूण गवे आणि कथा सांगाव्या तितक्या कमीच. दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते आणि यंदाच्या याच दिवसाचे औचित्य साधून गायक दिव्य कुमार यांनी शिवरायांना सुरेल नमन केले आहे.

उद्या १९ फेब्रुवारी असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुणगान करण्यासाठी प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार यांनी ‘सेर सिवराज है’ हे गाणे नव्या रूपात सादर केले आहे. दिव्य कुमार यांनी हिंदी मराठी विश्वात गायलेली अनेक गाणी अत्यंत लोकप्रिय आहेत. हे गाणे महाराजांचे गुणगान असून त्यांच्या साम्राज्यातील महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित आहे. ‘मानस मराठी’ प्रस्तुत हे गाणे दिव्य कुमार यांनी गायले असून संजय पटेल यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

महाराजांच्या जयंतीनिमित्त हे नवे गाणे ‘मानस मराठी’ युट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार आहे. या गाण्याचं दिग्दर्शन ज्ञानेश्वर राजकुले यांनी केले आहे. सध्या हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. या गाण्याचे संगीत संयोजन प्रसाद शिरसाठ यांनी केले असून गाण्याचे बोल आणि दिग्दर्शनातही त्यांचे सहयोग आहे. शिवाय कविभूषण, योगेश खरात, स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाठ यांचा देखील गाण्याचे बोल लिहिण्यास मदत केली आहे. तर या गाण्याचे रेकॉर्डिंग ‘अपोस्ट्रॉफी स्टुडिओ’ नाशिक, ‘डॉन स्टुडिओ’ पुणे आणि ‘साउंड आयडियाज स्टुडिओ’ मुंबई येथे पार पडले. या गाण्यात पुण्याचा लाडका रिल्स स्टार ऋषिकेश कणेकर, चैताली जाधव, अखिल सुगंध, हर्षवर्धन निकम यांनी भूमिका साकारल्या आहेत.