Take a fresh look at your lifestyle.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींवर Me Too’चे गंभीर आरोप; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ११ मार्च २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या काश्मीरमधून झालेल्या स्थलांतरावर भाष्य करतो. ज्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हे देखील यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. एकीकडे कौतुकाचा एव्हढा वर्षाव होत असताना आता दुसरीकडे त्यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘मी टू‘चे आरोप केले आहेत. हि बाब आणि हे आरोप सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘मी टू’चे आरोप केल्याचे समजताच हि बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तनुश्री दत्ता हिने २००५ सालामध्ये चॉकलेट हा चित्रपट केला होता. यावेळी विवेक यांनी आपल्याकडे चुकीच्या गोष्टींची मागणी केली होती असा आरोप तनुश्रीने केला आहे. यावेळी अभिनेता इरफान खान आणि सुनिल शेट्टीने आपली बाजू घेतली होती असा दावादेखील तनुश्रीने केला आहे. तिच्या या आरोपांवर विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि, तनुश्रीने पब्लिसिटीसाठी हे सर्व आरोप केले आहेत. अलीकडे काही दिवसांपूर्वी तनुश्रीने DNA या वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. तेव्हा तिने हे आरोप केले होते.

या आधी तनुश्री दत्ता हिने सुप्रसिद्ध नामांकित अभिनेता नाना पाटेकर यांच्यावरदेखील अश्याच पद्धतीचे आरोप केले होते. तिने २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटासाठी एक स्पेशल गाणे शूट केले होते. दरम्यान नाना पाटेकरांनी चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. करारानुसार ते गाणं फक्त माझ्यावर चित्रीत होणं अपेक्षित होतं. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगतील तसं करण्यास सांगितलं, असा खळबळजनक आरोप तनुश्रीने नानांवर केला होता. तसेच सेटवर नाना माझ्याशी असभ्य वर्तन करत असल्याचे अनेकांनी पाहिले पण कोणी माझ्यामागे उभे राहिले नाही, सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली, असंही ती म्हणाली होती.