Take a fresh look at your lifestyle.

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट..’तू तेव्हा तशी’; पुण्यात विविध ठिकाणी मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय झी मराठी वाहिनीवर नव्या कोऱ्या मालिकेच्या माध्यमातून रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल १० वर्षांनी छोटा पडदा गाजवण्यास सज्ज आहे. शिवाय ‘तुला पाहते रे’ या मालिकेमध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर अभिनेत्री शिल्पा तुळसकर या मालिकेत स्वप्नीलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक बहारदार रोमँटिक कथा नव्या रूपात आणि लाडक्या कलाकारांच्या माध्यामातून समोर येत आहे. या मालिकेचे नाव ‘तू तेव्हा तशी’ असून या मालिकेचे चित्रीकरण पुण्यात सुरु आहे. यानिमित्ताने स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर,अभिज्ञा भावे, दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते संदीप जाधव यांच्यासह अभिनेते सुनील गोडबोले, किरण भालेराव, अभिषेक राहाळकर यांनी मिडियासोबत गप्पा मारल्या.

दरम्यान नव्या मालिकेविषयी बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला कि, झी मराठीशी माझे खूप जुने नाते आहे. पुन्हा एकदा मालिकेच्या माध्यमातून रसिकांना भेटायला येण्याचा आनंद काही औरच आहे. पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर तशाच असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट म्हणजे ‘तू तेव्हा तशी’. ही मालिका प्रेक्षकांना आवडेल असा मला विश्वास आहे.

मालिकेविषयी बोलताना शिल्पा तुळसकर म्हणाली कि, मेघ दाटले या मालिकेनंतर जवळपास २० वर्षांनंतर या मालिकेतून मी प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. मी खूप उत्सुक आहे. पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येताना आनंद होतोय. स्वप्नीलसोबत खूप वेळानंतर पुन्हा काम करतेय.

त्यामुळे एकत्र काम करताना ऑन-स्क्रीन, ऑफस्क्रीन एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. या मालिकेचं कथानक वेगळं आणि सुंदर आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररित्या मांडलं आहे. जे प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Tulaskar (@shilpatulaskar)

या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत. हि कथा अव्यक्त पहिल्या प्रेमाची असून अत्यंत भावनिक आणि प्रेमळ अशी हि कथा आहे. यातून प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि प्रेम असेल तर सगळं जग जिंकता येत याचा व्यवस्थित प्रत्यय येईल. ‘तू तेव्हा तशी’ हि मालिका लोकप्रिय वाहिनी झी मराठीवर येत्या २० मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता प्रसारित होणार आहे.