हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा तितका कमीच आहे. त्यांचे कार्य कर्तृत्व इतके अपार आणि जाज्वल्य आहे कि ते मांडण्यासाठी उभा जन्म जाईल. गेल्या काही काळापासून शिवरायांप्रती असणारे प्रेम, भक्ती आणि आदर सादर करण्या हेतू अनेक निर्माते तसेच दिग्दर्शक ऐतिहासिक सिनेमे बनवताना दिसत आहेत. अलीकडेच ‘रावरंभा’देखील प्रदर्शित झाला आणि त्यानंतर आता आणखी एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिंहासनाधीश्वर’ असे असणार आहे.
दिनांक ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि येथून हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. हा शिवराज्याभिषेक म्हणजे अन्यायाच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या रयतेला मुक्त करून स्वाभिमानाने अन निधड्या छातीने जगण्याची उमेद देणारा अविस्मरणीय क्षण. या दिवशी रयतेच्या राजाने राज्यकर्ता म्हणून सर्वांना आपल्या छत्रछायेत घेतले तो हा दिवस. प्रतिकूल परिस्थितीतही आपण शत्रूशी सामना करु शकतो ही जिद्द निर्माण करणारे तेच हे तेजस्वी पर्व. या प्रेरणादायी इतिहासामुळेच आजही त्याच राजाची रयत धैर्याने सक्षमपणे उभी आहे. या सुवर्णक्षणाला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथी प्रमाणे २ जून २०२३ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला आणि याच सोहळ्यात शकील प्रॉडक्शन्स निर्मित ‘सिंहासनाधिश्वर’ या भव्य मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित अनेक ऐतिहासिक पट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एक नवीन ऐतिहासिक पट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचं नाव सिंहासनाधीश्वर. pic.twitter.com/Rx82CwjMuz
— devendra jadhav (@devendr50306300) June 5, 2023
या सोहळ्या दरम्यान चित्रपटाच्या घोषणेसह चित्रपटाच्या दिमाखदार पोस्टरचेदेखील मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हिंदी सिनेसृष्टीतील नामांकित निर्माते शकील खान यांची निर्मिती आणि विजय राणे यांचे दिग्दर्शन असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हा चित्रपट पुढल्या वर्षी म्हणजेच जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवरायांच्या पराक्रमाची आठवण नेहमीच स्वार्थासाठी, सोयीनुसार सगळे करत आले आहेत. तसेच रयतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगातून आताच्या पिढीने नेमके काय घ्यावे हे मांडण्याचा प्रयत्न आमही ‘सिंहासनाधिश्वर’ चित्रपटातून करणार आहेत, असे निर्माता आणि दिग्दर्शक यांनी सांगितले. यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘सिंहासनाधिश्वर’ या ऐतिहासिक भव्य दिव्य चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता पहायला मिळते आहे.
Discussion about this post