Take a fresh look at your lifestyle.

वाई तालुक्याचे सुपुत्र वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी नावात काय आहे? हे खरोखरीच सिद्ध करून दाखविले होते. कारण कुलकर्णी यांनी चारही वेदांचा मराठीत अनुवाद करीत पिढीला वेड समजून घेण्याची एक संधी उपलब्ध करून दिली होती. शिवाय त्यांनी ७० उपनिषदे यांचेही भाषांतर केले. आपल्या प्राचीन संस्कृतीचे मोठे देणे या समाज पुरुषाने जपले. म्हणूनच ते साक्षात वेद स्वरूप, ज्ञानस्वरूप होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. संस्कृतचे गाढे अभ्यासक वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांचे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने डोंबिवलीतील राहत्या घरी निधन झाले. दरम्यान त्यांचे वय ९९ होते. वार्ध्यक्याने सोमवारी त्यांचे निधन झाले. मुख्य म्हणजे याच वर्षी त्यांना त्यांच्या वेदांच्या अभ्यासाबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली होती.

वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी संपूर्ण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचे मराठीत भाषांतर केले. वेद स्वरूप होऊन ते काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात शुक्ल यजुर्वेदीय माध्य. ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी गुरुजींसह संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. माहितीनुसार, मे महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तीन आठवडे उपचार घेत कोरोनावर मात करून कुलकर्णी मे महिन्यातच घरी आले होते. यानंतर डिसेंबरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मूळचे सातारा जिल्यातील वाई तालुक्याचे सुपुत्र असलेले डॉ. भीमराव कुलकर्णी हे शिक्षण आणि त्यानंतर नोकरीनिमित्त मुंबईतील डोंबिवलीत आले होते. वाई येथे शालेय शिक्षण पूर्ण करताना त्यांचे शिक्षक गोटखिंडीकर यांनी त्यांना ऋग्वेदामध्ये विज्ञानाचा मोठा अर्थ दडल्याचे सांगितले. शिवाय तू कधी मोठा होऊन मोकळा वेळ मिळाला तर ऋग्वेदाचा मराठी अनुवाद कर आणि ते विज्ञान समाजासमोर आण, अशी सूचना केली होती. आपल्या गुरुजींचा शब्द कुलकर्णी यांनी पाळला. मुळात विज्ञान आणि संस्कृत त्यांचे शालेय जीवनापासून आवडीचे विषय होते. अशाच पध्दतीने वेदमूर्तींनी यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांच्या सखोल पुराणात प्रवेश न करता वैज्ञानिक शास्त्रीय अंगाने मराठीत अनुवाद केला.